मुंबई : मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडतोय. विकेण्डपासून सुरु असलेल्या या पावसाने काल दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे...सोमवारी सकाळपासूनच रस्ते, रेल्वे वाहतूकीवर याचा परिणाम दिसून येतोय.रेल्वे रूळांवर पाणी साचायला लागल्यामुळे गाड्या रांगायला लागल्या आहेत. मुंबईत सायन- माटुंगादरम्यान रेल्वे रूळांवर पाणी साचल्यामुळे गाड्यांची वाहतूक मंदावलीय. तर ऐन गर्दीच्यावेळी पश्चिम रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली.मरिन लाईन्सजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने अर्धा तास वाहतून थांबवण्यात आली होती. सायन, माटुंगा, दादर, किंग्स सर्कल, भोईवाडा, शिवडी, धारावी अशा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यामुळे पाणी साचले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरूवात झालीय. रेल्वे रूळांवर पाणी साचायला लागल्यामुळे गाड्या रांगायला लागल्या आहेत. मध्य रेल्वे २५ ते ३० मिनिटं उशीरा सुरू आहे. ठाण्यापासून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या रखडल्या आहेत. एका मागोमाग एक गाड्या ट्रॅकवर उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या पावसानंतर शिव परिसरातील रस्त्यावर पाणी साचलं होतं. त्यामुळे रस्त्याला जणू तळ्याचं स्वरुप आलं आहे. दरम्यान रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या वसाहती आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय..त्यामुळे इथल्या नागरिकांची चांगलीच तारंबळ उडालीय. 




पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. पश्चिम रेल्वेवर मरिन लाईन्सजवळ ओव्हरहेड वायर तुटलीय. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या दोन्ही मार्गावरच्या धीमी वाहतूक बंद आहे. तर जलद मार्गावरही दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे. मात्र यामुळे जलद मार्गावर कमालीचा ताण आलाय. त्यामुळे लोअर परळ स्टेशनपासून ते चर्चगेटपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्याचं चित्रं आहे. पश्चिम रेल्वेवर झालेल्या या बिघाडाची दुरूस्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रचंड पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या कामात अडथळा येतोय. 


मुंबईच्या दादर, भोईवाडा भागामध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचलंय. जोरदार पावसामुळे दृष्यमान कमी झालंय. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईत सध्या काळ्या ढगांनी दाटी केलीय. सकाळपासूनच ठिकठिकाणी जोरदार पाऊस कोसळतोय. पुढील बारा तासात मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.