मुंबई : उद्या शनिवार आणि रविवारी कोकणात जोरदार पाऊस होईल, असा हवामान विभागाने इशारा दिला आहे. त्याचबरोबर ठाणे आणि मुंबईतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकणात, रायगड भागात मुसळधार ते अतिमुसळधार होईल. मुंबई ठाणे पालघर ते रायगड, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर कमी दाबाच्या पट्टयामुळे नांदेड औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. मुंबईच्या अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे. घाटकोपर मुलुंड, भांडूप, ठाणे, कल्याण, पालघर, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली अशा अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 



दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत हाय अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.