मुंबई : यंदा सप्टेंबर संपला तरी पाऊस काही थांबलेला नाही. सामान्य नागरिक आता पावसाच्या जाण्याची वाट पाहताना दिसत आहे. ऑक्टोबर आला तरी पाऊस येत असल्यामुळे चाकरमान्यांचा खूप गोंधळ होत आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे सगळेच हैराण झाले आहेत. आतापर्यंत सप्टेंबर महिन्यात कधीच एवढा पाऊस पडला नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१०२ वर्षांतला सर्वाधिक पाऊस असणारा हा सप्टेंबर महिना असा सप्टेंबर २०१९चा विक्रम आहे. देशात जून आणि जुलै महिन्यात सरासरीच्या ९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात ४८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. देशभरात या महिन्यात २४७.१ मिमी पाऊस झाला आहे. अजूनही गुजरात आणि बिहारमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.


जर अतिवृष्टी झाली तर हा सप्टेंबर, शतकातला सर्वाधिक पाऊस पडलेला महिना ठरेल. या पावसाळ्यात ९५६.१ मिमी पाऊस झाला आहे. जो ९ टक्के अधिक आहे. अजूनही उत्तर भारतात काही ठिकाणी पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं आतातरी पावसानं थांबांव अशी प्रार्थना सगळेच करताना दिसत आहेत. 


पावसाच्या या अनियमितपणामुळे भाजी-पाल्यांच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. पुण्यातही 5 दिवस ढगफुटीसदृष झालेल्या पावसाने नागरिकांची दाणादाण उडवून दिली. पुण्यात एका रात्रीत पावसाने 10 बळी घेतले. सलग २ तासाच्या पावसानं शहर आणि परिसरात अक्षरश: कहर केला. विशेष करून कात्रज, आंबेगाव तसेच सिंहगड रोड परिसरातील ओढे नाले ओव्हरफ्लो होऊन त्यांचं पाणी वस्त्यांमध्ये शिरलं. अनेक सोसायट्या तसेच झोपडपट्टी भागांत पाणी शिरलं. रस्ते पाण्याखाली जाऊन त्यांना ओढ्याचं स्वरुप आलं. एरव्ही हवा हवासा वाटणारा पाऊस यंदा मात्र भीतीदायक ठरला आहे. पावसात अनेकांनी आपला जीव गमावला आहे.