मुंबई : Hijab Controversy : धक्कादायक बातमी. देशभरात आणि महाराष्ट्रात ज्या मुद्यावरून रणकंदन सुरू आहे तो मुद्दा आता मुंबईतही पेटण्याची चिन्हं आहेत. कर्नाटकातल्या हिजाबबंदीविरोधात देशभरात निदर्शनं होत असताना आता मुंबईतल्या एका महाविद्यालयामध्ये हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे. (Mumbai college ban hijabs in campus amid Karnataka controversy?)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातील हिजाब वादामुळे विद्यार्थी, समाजातून तसेच राजकीय नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत, परंतु अनेक राज्यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये याचे अनुसरण केल्याचे वृत्त पुढे येत आहे. त्यामुळे आता हा वाद जास्त उफाळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


 मुंबईतील एका महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी हिजाब घालण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील या महाविद्यालयाने ‘हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश नाही’ अशी नोटीस बजावली आहे, असा आरोप समाजवादी पार्टीच्या आमदारांनी केला आहे.


माटुंग्यातल्या एम पी शाह कॉलेजने हिजाबवर बंदी घातल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. शेख यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्रही लिहिले आहे. विशेष म्हणजे एम पी शाह महाविद्यालयाने आपल्या वेबसाईटवरही या बंदीबाबत जाहीर केल्याचाही आरोप रईस शेख यांनी केला आहे. मात्र, महाविद्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


हिजाबचं राजकारण देशभरात आणि महाराष्ट्रात चांगलंच तापले आहे. त्याला आणखी हवा देण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. ते म्हणजे सध्या देशात निवडणुका सुरू आहेत. मात्र मुंबईतल्या या बंदीमुळे मुंबई आणि महाराष्ट्रात वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत.