Mumbai Local Viral Video: लोकल (Mumbai Local) म्हणजे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपास वसलेल्या शहरवासीयांसाठी लाइफलाइनच आहे. मुंबई लोकलमधून रोज हजारो लोक प्रवास करतात. यावेळी कित्येक अनोळखी चेहरे हे एकमेकांचे घट्ट मित्र होतात आणि नव्याने मैत्रीचा प्रवास सुरु होतो. ऑफिसमध्ये आलेला सगळा शीळ या लोकलमध्ये गप्पा मारत, भजनं गात घालवला जातो. दरम्यान असाच काही प्रवाशांचा गाणी गातानाचा एक व्हिडीओ ट्विटरला (Twitter) व्हायरल (Viral Video) झाला आहे. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर रंग लागलेला दिसत असल्याने ते एकाप्रकारे होळीच (Holi) साजरी करत असल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

@Chilled_Yogi या अकाऊंटवरुन ट्विटरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ट्रेनमध्ये प्रवासी दिवंगत गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. लता मंगेशकर यांच्या 'सुन चंपा, सुन तारा' आणि 'दो घुंट मुझे भी पिला दे' गाण्यावर हे प्रवासी तल्लीन होऊन गात असताना इतर प्रवासीही त्यांना साथ देत आहेत. गाण्यासह संगीताची जोड असावी यासाठी प्रवासी पत्र्यावर हात आपटत तालाची जोड देण्याचा प्रयत्न करत आहेत. 


हा व्हिडीओ नेमका कधी शूट केला आहे, हे व्हिडीओतून स्पष्ट होत नाही. मात्र प्रवाशांच्या चेहऱ्यावर लागलेला रंग पाहता हा सध्याचाच व्हिडीओ असावा असा अंदाज आहे. अनेकदा ट्रेनमध्ये सणांना सुट्टी असल्याने प्रवाशी आधीच सेलिब्रेशन करत असतात. "मी पाहिलेल्या सर्वोत्तम जॅमिंग सेशनपैकी एक," अशा कॅप्शनने हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 4 मार्चला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून 22 हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे. 



या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली असून हे प्रवासी प्रवास किती सुंदर बनवतात असं म्हटलं आहे. तर काहींनी मुंबई लोकल ही एक भावना असल्याचं म्हटलं आहे. तसंच एकाने इतक्या छोट्या जागेतही आनंद मिळवणं फार मोठी गोष्ट असल्याचं सांगितलं आहे. एका युजरने मुंबईप्रती आपल्या भावना व्यक्त करताना मुंबई सोडल्यावर या गोष्टींची फार आठवण येते असं म्हटलं आहे.