सुबोध कुमार, झी मीडिया, मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे. मुंबईतले हॉटेल्स आणि बार रात्रभर उघडी राहणार आहेत. पण रंगाचा बेरंग करणाऱ्यांचं काही खरं नाही. पोलिसांनी धिंगाणा घालणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन वर्ष साजरं करण्यासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात पहाटे पाच वाजेपर्यंत बार आणि हॉटेल्स उघडी राहणार आहेत. त्यामुळं सगळ्यांना पहाटेपर्यंत पार्टी करता येणार आहे. सेलिब्रेशन करणाऱ्यांची गर्दी पाहता मुंबईतले काही मार्गही बदलण्यात आले आहेत. 


जुहू, वांद्रे रेक्लेमेशन, माहीम, सिद्धीविनायक, हाजीअली, चर्नी रोड, मरिन लाईन्स आणि गेट वे ऑफ इंडियाला जाण्यासाठीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बोट पार्टीला परवानगी नसणार आहे.


नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईत आलेल्यांना घरी जाण्यासाठी चर्चगेट ते विरार आणि सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. बेस्टने काही मार्गावर विशेष बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पार्टी करा पण दारु पिऊन गाडी चालवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय.


नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करा पण सामाजिक शांततेला धोका पोहचवू नका.