COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनी पवार (पुणे), अमित जोशी, मुंबई, झी मीडिया : नेमेची येतो मग पावसाळा... पण या पावसाळ्याआधी वेध लागतात ते पावसाच्या अंदाजाचे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अनुमानावर शेतकऱ्यांचं नियोजन अवलंबून असतं. शहरांमध्ये सुरू असलेले रस्ते, पूल यांच्या कामाचं नियोजन त्यानुसार होतं. हा अंदाज जितका अचूक, तितकं चांगलं. मुळात देशात पडणाऱ्या एकूण पावसापैकी ७० ते ९० टक्के पाऊस हा नैऋत्य मौसमी वाऱ्यांमुळे पडतो. उन्हाळ्यात जमीन तापल्यामुळे भारतीय उपखंडात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे नैऋत्य दिशेकडून वारे वाहायला लागतात. हे वारे येताना हवेतलं बाष्प घेऊन येतात. त्याचे ढग होतात आणि ठराविक कालावधीत आपल्या देशावर वरुणराजाची बरसात होते. अशा पद्धतीनं वर्षातल्या ठराविक कालावधीत पाऊस पडणारा हा जगातला एकमेव प्रदेश आहे. मात्र या लहरी मान्सूनच्या आगमनाचा अंदाज बांधण तितकं सोप नाही. कित्येक वर्षांची आकडेवारी आणि मॉडेल्सच्या मदतीनं अनही हे अंदाज बांधले जातात.


कधी झाली हवामान विभागाची स्थापना?


भारतात हवामान विभाग अस्तित्वात आला तोच मुळी एका अस्मानी संकटामुळे... १८८५ साली बंगाल प्रांताला दोन चक्रीवादळांचा तडाखा बसला. त्यानंतर तेव्हाच्या ब्रिटिश सरकारनं हवामान विभागाची स्थापना केली. यानंतर हवामानाचा अंदाज बांधण्याच्या पद्धतीत अनेक बदल होत गेले.


हिवाळ्यात हिमालयामध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीवरून मान्सूनचा अंदाज बांधला जात असे. ढोबळ मानानं बर्षवृष्टी जास्त झाली तर मान्सूनचं प्रमाण कमी आणि बर्षवृष्टी कमी झाली तर पाऊस जास्त, असं अनुमान काढलं जायचं. मात्र यातल्या त्रुटी लक्षात आल्यानंतर हे मॉडेल कालबाह्य झालं.


२००३ पासून तंत्रज्ञानात बदल


१९२४ पासून १६ पॅरामीटर मॉ़डेलच्या साह्यानं मान्सूनचा अंदाज बांधला जाऊ लागला. मात्र २००२ मध्ये पडलेल्या दुष्काळाचा अंदाज बांधण्यात हे मॉडेल अपयशी ठरल्यानंतर पुढल्या वर्षीपासून आरएलएफ या अद्यायावत प्रणालीच्या साह्यानं मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यात आला. यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत होणा-या पावासाचं अनुमान बांधलं जाऊ लागलं.


मान्सूनचे तीन वेगळे अंदाज


सध्याच्या काळात सीएफएस ही प्रणाली वापरली जाते. यात मान्सूनचे तीन वेगवेगळे अंदाज दिले जातात. यातला एक अंदाज हा संपूर्ण ऋतूचा म्हणजेच जून ते सप्टेंबर असतो. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचा दुसरा अंदाज असतो आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांचाही एक अंदाज दिला जातो. या मॉडेलमध्ये देशाच्या भूभागांचे वायव्य, ईशान्य, मध्य आणि दक्षिणी किनारपट्टी असे भाग करण्यात आलेत. वा-याची दिशा, जमिनीचं तापमान, हवेचा दाब, समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान, या सगळ्या बाबींचा अभ्यास यामध्ये केला जातो.


१०० किमीच्या परिघात वेधशाळा


देशभरात प्रत्येक १०० किलोमीटरच्या परिघात वेधशाळा उभारण्यात आल्या असून प्रत्येक वेधशाळेच्या उभारणीचे मापदंड समान ठेवण्यात आलेत. यासोबतच खोल समुद्रात असलेली जहाजं, हवामानाचा अभ्यास करणारे उपग्रह यांच्यामार्फत आलेल्या नोंदीही साठवल्या जातात. भुपृष्ठापासून १.८ किलोमीटर उंचीवर हवेचा अभ्यास मान्सूनच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक वेधशाळेतून रोज सकाळी आणि संध्याकाळी एक फुगा आकाशात सोडला जातो. या फुग्यावर बसवलेल्या सेन्सर्सच्या मदतीनं हवेचा दाब, तापमान, वाऱ्याची दिशा, हवेमधली आर्दता यांच्या मिनीटा मिनीटाच्या नोंदी घेतल्या जातात. सर्व वेधशाळांमधली प्रत्येक नोंद संगणकामध्ये एकत्र केली जाते. अन्य देशांकडून आलेली माहितीही गोळा केली जाते. या सगळ्या नोंदींमधून आकडेवारी मांडली जाते. गेल्या १०० वर्षांमधल्या पावसाच्या आकडेवारीशी याची सांगड घालून गणिती मॉडेल्सच्या आधारे मान्सूनचा अंतिम अंदाज बांधला जातो.


देशभरात रडारचं जाळं


दररोजची निरिक्षणं, यात हाती येणारी आकडेवारी आणि या दोन्हीची सांगड घालणारी मॉडेल्स ही मान्सूनच्या अंदाजाची त्रयी म्हणता येईल. सध्या आपण वापरत असलेली ही प्रणाली जगातली उत्कृष्ठ असल्याचा दावा हवामान शास्त्रज्ञ करतात. पण या दीर्घकालीन अनुमानासोबत पावसाळा सुरू असताना पुढल्या दोन-तीन तासांमधल्या पावसाचा अंदाज बांधणंही महत्त्वाचं असतं. विशेषतः अतिवृष्टी होणार असेल तर ही माहिती फारच महत्त्वाची... २६ जुलैच्या पुरानंतर मुंबईमध्ये अशी यंत्रणा उभारण्यात आलीये. ही यंत्रणा म्हणजेच बहुचर्चित डॉप्लर रडार. याच्या पहिल्या टप्प्यात देशभरात ३० पेक्षा जास्त डॉप्लर रडारचं जाळं उभारण्यात आलंय. दुस-या टप्प्यात आणखी ३० रडार उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आहे. या रडारमुळे अतिवृष्टीचा इशारा किमान काही तास आधी मिळणं शक्य झालंय.


भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही देशातील ५० ट्कक्यांहून अधिक जनता शेती आणि शेतीशी संबधीत पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत मान्सूनचा वाटा अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळेच भारताचा अर्थसंकल्प म्हणजे मौसमी वाऱ्यांशी खेळलेला जुगार आहे, असं म्हटलं जातं. मात्र फार काळ जुगार खेळणं परवडणारं नसतं. त्यामुळेच अधिकाधिक अचूक अंदाज वर्तवण्याची जबाबदारी हवामान विभागाला पार पाडावी लागते. याला अद्याप १०० टक्के यश मिळालं नाहीये, हे खरं आहे. पण हे ही नसे थोडके...