`लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरी झालेल्या पार्टीची चौकशी करा`, शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे. लॉकडाऊनच्या काळात सुशांतसिंगच्या घरी पार्टी कशी झाली? त्या पार्टीला कोण उपस्थित होतं? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. मुंबई पोलीस सक्षम असल्यामुळे या प्रकरणाचा छडा लावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सुशांतसिंगं राजपूत आत्महत्याप्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. हा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी भावना सामान्यांमध्ये आहे, पण राज्य सरकार त्यासाठी तयार नसल्याचं फडणवीस म्हणाले होते. तसंच याप्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा संशय असल्यामुळे ईडीने कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. यानंतर काही तासांमध्येच ईडीने याप्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोवितवर गुन्हा दाखल केला.
दुसरीकडे भाजप आमदार आणि प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी सुशांतप्रकरणावरुन गंभीर आरोप केले. सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणाच्या तपासात एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत, असा आरोप भातखळकर यांनी केला. तसंच सीबीआयने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केली आहे, असंही भातकळकर म्हणाले.
याबाबत अतुल भातकळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिलं आहे. तसंच माझा रोख कुणाकडे आहे, हे उघड गुपित असल्याचंही भातकळकर म्हणाले आहेत.
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही या प्रकरणाच्या तपासावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. बिहार पोलिसांच्या तपासामध्ये मुंबई पोलीस अडथळे आणत आहेत. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे ही केस सीबीआयला देण्यात यावी, अशी मागणी सुशील मोदींनी केली आहे. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये याप्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर या सगळ्या वादात बिहार पोलिसांची एन्ट्री झाली आहे.
सुशांतसिंग प्रकरणाची चौकशी सीबीआयला द्यावी, अशी मागणी फक्त भाजपच नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी केली होती. यासाठी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेटही घेतली. पण मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत असल्याचं सांगत गृहमंत्र्यांनी ही मागणी फेटाळली.