मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल तडखाफडकी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्यात खळबळ उडवून दिली. अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झाल्याचं सांगण्यात आलं. यानंतर धनंजय मुंडेंबाबतचा संशय बळावला. यानंतर आता खुद्द धनंजय मुंडे यांनीच ट्विट करून हा संभ्रम दूर केला आहे. मी पक्षासोबत, मी आदरणीय पवार साहेबांसोबत. कृपया कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करू नये ही विनंती, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बोलावलं होतं. यानंतर अजित पवार या आमदारांना घेऊन राजभवनावर गेले. राजभवनावर गेलेले आमदार पुन्हा एकदा शरद पवारांकडे आले. शरद पवार पत्रकार परिषदेमध्ये या आमदारांना घेऊन आले. या आमदारांनीही सगळा घटनाक्रम माध्यमांना सांगितला.


आमदारांनी हा घटनाक्रम सांगितल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. याचवेळी धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झाले होते, अखेर अचानक धनंजय मुंडे काल वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीत दाखल झाले.