महाराष्ट्राचा मीच मुख्यमंत्री, फडणवीस मीडियावर घसरलेत
मी केंद्रात जाणार ही केवळ चर्चा आहे. मी काही केंद्रात जाणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबई : 'मी केंद्रात जाणार ही केवळ चर्चा आहे. मी काही केंद्रात जाणार नाही', असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचवेळी महाराष्ट्रात मीच मुख्यमंत्री राहणार, असे सांगत चर्चेला पुर्नविराम दिला. मात्र, यावेळी ते मीडियावर घसरलेत. अशा बातम्या देऊन शेवटी मीडियाचे दुकान पण चालले पाहिजे ना. ते भाजप कार्यकारणी बैठकीत बोलत होते.
मला दिल्लीतून बोलवत नाहीत, तोपर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार आहे. मीडियाला दुकानदारी चालवायची असेल तर बातम्या द्याव्या लागतात, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मीडियावरही तोंडसुख घेतले.
'लोकांमध्ये विश्वास निर्माण केला तर भाजप कधीच पराभवाचे तोंड पाहणार नाही. या देशात जर कोणी परिवर्तन घडवू शकतं, तर ते नरेंद्र मोदी घडवू शकतात, असा लोकांना विश्वास आहे. सरकार चांगले निर्णय घेते, मात्र ते खालीपर्यंत पोहोचवले जात नाही, ते काम करणे गरजेचे आहे.'
'मी मीडियाला दोष देणार नाही. आपल्याबाबत काही दाखवले नाही तर त्यांची दुकानदारी चालणार नाही. मी जाणार म्हणून बातम्या आल्या. तेव्हा जोपर्यंत मला बोलावले जाणार नाही तोपर्यंत जाणार नाही. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका जिंकल्या आहेत, ते कोठेही जाणार नाहीत,' असे मुख्यमंत्री म्हणालेत.
विरोधकांच्या संघर्ष यात्रेला शेवटची सभा सोडली तर प्रत्येक सभेला एक हजार पण लोक नव्हती. माझ्या सभेत २० हजार लोक होती. मात्र, चार लोकांनी आंदोलन केले तर मीडिया म्हणते सभेत गोंधळ झाला.बंद मालगाडी समोर रेल रोको आंदोलन केले. १२ लोक मालगाडीवर चढली होती आणि मग मीडियाने बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली. शेवटी मीडियाचे दुकान पण चालले पाहिजे ना, असे ते म्हणाले.