देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या मतदारसंघात बॅलेट पेपरच्या माध्यमातून फेरनिवडणूक घ्यावी. यानंतर निकालामध्ये फरक दिसला नाही तर आयुष्यात मिशा काय भुवयाही ठेवणार नाही, असे आव्हान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयनराजे भोसले यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ईव्हीएम यंत्र सदोष असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी म्हटले की, कुठलीही मशीन ही माणूसच तयार करतो. त्यामुळे ईव्हीएम यंत्र पूर्णपणे सदोष आहे, असे म्हणणे चुकीचे ठरले. माणसाची शाश्वती देता येत नाही, तर ईव्हीएम यंत्राचं काय घेऊन बसलातं? जर संगणक हॅक होऊ शकत असेल तर ईव्हीएम यंत्र हॅक होईल, अशी शंका उपस्थित करण्यात काय गैर आहे, असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला.


यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला सातारा लोकसभा मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्याचे आवाहन केले. सातारा लोकसभा मतदार संघातील विधानसभेच्या सहा मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यात फरक आढळून आला होता.
 
त्यामुळे मी निवडणूक आयोगाला जाहीर आव्हान देतो की, साताऱ्यात पुन्हा एकदा बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घ्यावी. त्यासाठी मी कधीही राजीनामा द्यायला तयार आहे. ईव्हीएम यंत्राच्या साहाय्याने निवडणूक घेताना जास्त खर्च येतो. हीच निवडणूक बॅलेट पेपरद्वारे झाली तर कमी खर्च येईल. या फेरनिवडणुकीचा बोजा मी मतदारांवर टाकणार नाही. यानंतरही निकालामध्ये फरक दिसला नाही तर मी आयुष्यभर मिशा काय भुवयांचे केसही ठेवणार नाही, असे उदयनराजे यांनी म्हटले. 


उदयनराजे यांनी स्वतंत्रपणे ही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले. मी देशाचा सेवक म्हणून स्वत:चे मत व्यक्त करत असल्याचेही त्यांनी सांगितले.