मुंबई : मुंबई शहरात अनेक मोडकळीस आलेल्या जुन्या व जीर्ण इमारती आहेत. या इमारतींची दुरुस्ती आणि पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे. त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी म्हाडाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. मात्र, म्हाडामधील ५२३ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील काळात म्हाडाच्या जागेवर कर्मचारी नाहीत, असे होणार नाही असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी पुनर्विकास होत असताना रहिवाश्यांना तात्पुरते निवास देण्यासाठी संक्रमण शिबीरांची संख्या कमी असल्याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.


दक्षिण मुंबईत १०० ते २०० वर्ष जुन्या इमारती असून त्यांची दुरुस्ती आणि पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे. येथील रहिवासी दूर ठिकाणी ट्रान्झिट कँपमध्ये जाणार नाहीत, त्यांची जवळच कुठेतरी व्यवस्था करावी लागणार आहे. एमएमआर रिजनमध्ये जमीन मिळते का ते पाहून ट्रान्झिस्ट कँप बांधावे लागणार आहे असे आव्हाड म्हणाले.


ट्रान्झिट कँपमध्ये घरे विकणारी एजंटची टोळी कार्यरत असल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला. हे टाळण्यासाठी म्हाडा कार्यालय आणि ट्रान्झिट कँपच्या ठिकाणी सुरक्षित फलक लावला जाईल. आतापर्यंत फसवणूक झालेल्या प्रकरणात पुढील दोन-तीन महिन्यांत कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 


मुंबईतील संक्रमण शिबीरात जे घुसखोर बेकायदेशीर वास्तव्यास आहेत, त्यांची चौकशी सुरू केली आहे. संक्रमण शिबिरात ३०-४० टक्के घुसखोर असून त्यांना बाहेर काढावे लागेल. काही घुसखोरांना कालांतराने सरकारनेच मान्यता दिली असली तरी यापुढे असे घुसखोर घुसणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल. 


सरकारी यंत्रणेचा हात असल्याशिवाय घुसखोर घुसणार नाहीत. त्यामुळे संक्रमण शिबीरात असे घुसखोर आढळून आल्यास त्याठिकाणच्या रेंट कलेक्टरला घरी बसवले जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.