मुंबई: एकनाथ खडसे काँग्रेस पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपने आमचे आमदार फुटण्याची काळजी करू नये. याऐवजी त्यांनी स्वत:च्या आमदारांची चिंता करावी. भाजपचे अनेक नेते नाराज आहेत. जनतेला नाथाभाऊंची अवहेलना आवडलेली नाही. काँग्रेसने अद्याप खडसे यांच्याशी संपर्क साधलेला नाही. मात्र, एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल. त्यामुळे आमच्या पक्षाची ताकद वाढेल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीसंदर्भातही भाष्य केले. पंकजा मुंडे नाराज असल्याचे दिसत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून आमचे पंकजा यांच्याशी संबंध आहेत. आम्हाला त्यांच्या नाराजीचे कारण ठाऊक नाही. मात्र, भाजपने त्यांची नाराजी कशी कमी करता येईल, याचा विचार करावा, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. 



दरम्यान, आता एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या आगामी वाटचालीविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. एकनाथ खडसे यांनी कालच दिल्लीत जाऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांच्यासोबत पक्षातील लोकांनीच दगाफटका केल्यामुळे एकनाथ खडसे प्रचंड नाराज आहे. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे मांडायला सुरुवात केल्यानंतर दिल्लीतील नेतृत्वाने सोमवारी खडसे यांना बोलावून घेतले होते. मात्र, त्यांच्यासमोर मन मोकळे केल्यानंतरही एकनाथ खडसे यांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही. कालच (सोमवारी) त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर ते आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, काल रात्री एकनाथ खडसे यांनी एक सूचक विधानही केले होते. मी आजतरी भाजपमध्येच आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले होते. त्यामुळे एकनाथ खडसे वेगळा मार्ग निवडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.