मुंबई : कुर्ला स्थानक परिसरातील झोपडपट्टीत अत्यंत गलिच्छ जागेत वडा, समोसा तयार केले जातात आणि तिथून ते रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या स्टॉलवर आणले जातात. सडके बटाटे  वडा, समोसा बनवण्यासाठी वापरले जात असल्याचं दिसून आलंय. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं याठिकाणी धाड टाकून हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.


मुंबईकरांनो, वडा, सामोसा खाताय ?


... थांबा.


आधी हे वाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूकेला हमखास पोटभरीचा वडा पाव आणि सामोसा. पण मुंबईकरांनो, तुमचा लाडका वडापाव अनेक ठिकाणी कसा बनतो हे पाहाल आणि वाचाल तर घशाखाली एक घासही उतरणार नाही. 


रेल्वे स्थानकांच्या स्टॉलवर सर्वाधिक विकले जाणारे वडा आणि सामोसा नेमके कुठे तयार होतात हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कुर्ला स्थानकाला लागूनच पूर्वेला असणाऱ्या झोपडपट्टीत अत्यंत गलिच्छ जागेत वडा, समोसा तयार केले जातात. एका छोट्या झोपडीमध्ये घामाने भिजलेल्या अवस्थेत दोन कर्मचारी समोसा तयार करण्याचे काम करताना आढळले. या ठिकाणी सर्वत्र अस्वच्छता तर होतीच शिवाय हे पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. सडके बटाटे सामोसा, वडा बनवण्यासाठी वापरले जात होते. त्यामुळे तुम्ही असा वडा-सामोसा खाऊ शकता का? 


मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने धाड टाकून हा प्रकार उघड केला. तीन गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. महिन्यापूर्वी महापालिकेच्या एल विभागाने याप्रकरणी संबंधितांना नोटीसही दिली होती. पण तरीही इथे वडा, समोसा बनवणे सुरुच ठेवल्याने अखेर ही कारवाई करण्यात आली. वड्यानंतर आता कथा सामोशाची. दहा रुपयांचा वड़ा पाव खा किंवा थिएटरमधला शंभर रुपयांचा सामोसा. तुमच्या आरोग्याशी खेळ सुरू आहेच.


कल्याणच्या सर्वोदय मॉलमधल्या एस एम फाईव्ह थिएटरमधला हा सामोसा. या सामोशामध्ये चक्क मोठ्ठा कपड्याचा तुकडा सापडला. तब्बल ९० रुपयांना हा सामोसा मिळतो. मुंबईकरांनो, बाहेरचा वडापाव, सामोसा आणि इतर पदार्थ खाताना शंभर वेळा विचार करा. तुम्ही खाताय ते पदार्थ नक्की सुरक्षित आहेत का, चांगल्या ठिकाणी तयार करण्यात आलेत का, याची खात्री करा. आणि मगच ताव मारा. नाहीतर आरोग्याचे खरं नाही.