मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने पुण्यात स्वप्नील चव्हाण या तरुणाने आत्महत्या केली होती. याचे पडसाद आजपासून सुरु झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. एमपीएससीच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. दरम्यान, सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली. 


उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमपीएससी देणाऱ्या SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. SEBC आरक्षणाबाबतच्या न्यायालयीन लढ्यामुळे नोकरभरती प्रक्रिया रखडल्या आहेत. त्या भरती प्रक्रियेतील SEBC उमेदवारांची वयोमर्यादा 38 वरून 43 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली. 2014 चा SEBC कायद्याला उच्च न्यायालयात स्थगिती आल्यामुळे ज्या उमेदवारांना अकरा महिन्याच्या नियुक्त्या देण्यात आल्या होत्या त्यांना कायम करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.  मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने यासाठी मान्यता दिली आहे असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.


अजित पवार यांची मोठी घोषणा


एमपीएससीच्या ( MPSC) रिक्त असलेल्या जागा भरणार, अशी घोषणा विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार यांनी ही घोषणा केली. एमपीएससीच्या रिक्त जागा या 31 जुलैपर्यंत भरण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होईल. त्यानंतर तात्काळ या जागा भरण्यात निर्णय होऊन त्या भरल्या जातील, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.