मुंबई : विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यात महायुतीचं सरकार येण्याचं चित्र आहे. राज्यात भाजपाला अधिक मतं मिळाली आहेत. तर त्यामागे शिवसेना, राष्ट्रवादी आणि शेवटी काँग्रेसला जनतेने पसंती दर्शवली आहे. परंतु काही मतदारांनी आपल्या मतदारसंघातून कोणताच उमेदवार पात्र नसल्याचं मानत 'नोटा' या पर्यायाला पसंती दर्शवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मतदारसंघात कोणत्याही पक्षाचा उमेदवार पात्र नसल्याने मतदारांनी 'नोटा' पर्यायाची निवड करत आपला मतदानाचा अधिकार बजावला. 'नोटा'ला मत देणाऱ्या मतदारांची मोठी संख्या समोर आली आहे. या संख्येत वाढ झाल्याचंही समोर आलं आहे.


पलूस कडेगाव मतदारसंघातून विश्वजित कदम यांनी १ लाख ६२ हजार ५२१ असं भरघोस मताधिक्य मिळवलं. पण विश्वजित कदम यांच्यानंतर दोन क्रमांकाची मतं ही नोटा या पर्यायाला मिळाली आहेत. पलूस कडेगाव मतदारसंघातून नोटाला २०६३१ मतं मिळाली आहेत.


दुसरीकडे, लातूर मतदारसंघातही 'नोटा'ला पसंती मिळली असल्याचं चित्र आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघात ७ हजार ६१९ मतदारांनी 'नोटा'ला मतं दिली आहेत. या मतदारसंघातून नोटाला मिळालेली ही दुसऱ्या क्रमांकाची मतं असल्याची माहिती मिळत आहे.


  


दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन्ही चिरंजीव निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. अमित देशमुख लातूर शहर मतदारसंघातून निवडून आले असून धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 


मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील १२०३१ मतदारांनी नोटाचं बटण दाबलं आहे. या मतदारसंघातून शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांचा ९० हजार ६५४ मतांना विजय झाला आहे.