झोप पूर्ण न झाल्याने आरोग्याला होणारे तोटे
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांची झोप पूर्ण होत नाही. दिवसभराचा थकवा दूर घालवण्यासाठी व्यक्तीने आराम हा केलाच पाहिजे. यासाठी रात्रीची पुरेशी झोप फार महत्त्वाची असते.
मुंबई : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांची झोप पूर्ण होत नाही. दिवसभराचा थकवा दूर घालवण्यासाठी व्यक्तीने आराम हा केलाच पाहिजे. यासाठी रात्रीची पुरेशी झोप फार महत्त्वाची असते.
रोगप्रतिकारक शक्तीसाठी घातक
मात्र झोप पूर्ण झाली नसल्यास त्या व्यक्तीमध्ये त्याची लक्षणं दिसून येतात. अनेक अभ्यासांच्या माध्यमातून जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर पुरळ उठतात.
पुरेशी झोप न मिळणं हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी घातक ठरू शकतं आणि याचा परिणाम म्हणजे, इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
झोप पूर्ण न होण्याची लक्षणं
डोळ्यांवर परिणाम
अनेक अभ्यासांमधून देखील असं लक्षात आलंय की, व्यक्तीला पुरेशी झोप न मिळाल्यास डोळ्यातून सातत्याने पाणी येणं, डोळ्यांखाली सूज येणं, डोळ्यांखालची त्वचा सुरकुतणं अशा समस्या आढळतात.
झोप पूर्ण झाली नसेल तर डोळे लाल होतात, सुजतात आणि डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ येतात. जर तुम्हाला सकाळी डोळ्यांसंबंधी या समस्या उद्भवत असतील तर ही तुमच्या अपुऱ्या झोपेची कारणं आहेत.
अचानक वजन वाढणं
कमी झोपेमुळे हार्मोन्सचं प्रमाण नियंत्रणात न राहता अधिक भूक लागण्याची समस्या उद्भवते. परिणामी तुमचं वजन वाढतं. जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेता तेव्हा तुमचे हार्मोन्स नियंत्रणात राहतात. आणि या हार्मोन्सचा परिणाम तुमच्या भूकेवर होतो.
जंक फूड खाण्याची इच्छा
झोप पूर्ण झाली नाही की मेंदूला आरोग्यासाठी योग्य नसणारे पदार्थ खाण्याची इच्छा होते. कारण झोप पूर्ण न झाल्याने आपण थकतो आणि अशा वेळी झटपट तयार होणाऱ्या पदार्थांना प्राधान्य देतो.तुमची झोप अपुरी राहिली असेल तर सकाळी तुम्हाला चीज बर्गर, फ्राईज असे पदार्थ खाण्याची इच्छा होते.
जास्त कॉफी पिण्याची इच्छा
जेव्हा व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा त्या व्यक्तीला जास्त प्रमाणात कॉफी पिण्याची सवय लागते.जर तुमची अति कॉफी पिण्याची सवय मोडत नसेल तर कदाचित तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसणार.
सातत्याने चिडचिड
एका अभ्यासाच्या माध्यमातून असं लक्षात आलंय की ज्या व्यक्ती रात्रीची कमी झोप घेतात त्यांच्यात ताणतणाव, रागीटपणा, चिडचिडेपणा दिसून येतो.सातत्याने चिडचिड होत हे असल्यासं पुरेशी झोप न मिळण्याचं लक्षणं असतं.
वेळेवर झोपा, वेळेवर उठा
दररोजचं वेळापत्रक तयार करा, वेळापत्रकानुसार वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा, तुम्ही झोपत असलेली खोली थंड आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, दररोज नियमितपणे व्यायाम करा, जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागेल.