मुंबई: शहरातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे नवनियुक्त आयुक्त इकबाल चहल यांनी शनिवारी रात्री अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी कोरोनाला रोखण्यासंदर्भात उपाययोजनांची चर्चा झाली. मुंबई हा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. धारावी परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन असूनही मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच प्रवीण परदेशी यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या जागी आता इकबाल चहल यांच्याकडे मुंबई महानगपालिकेची सूत्रे देण्यात आली आहेत.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी पहिल्याच दिवशी इकबाल चहल यांनी जोशात कामाला सुरुवात केली. त्यांनी काल दिवसभरात धारावी आणि दादरमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. याशिवाय, त्यांनी खास COVID-19च्या रुग्णांसाठी असलेल्या नायर रुग्णालयात जाऊनही रुग्णांची विचारपूस केली होती. यानंतर काल रात्री झालेल्या बैठकीत त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या बैठकीदरम्यान मान्सूनपूर्व कामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.


हे आहेत मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे आयुक्त इक्बाल चहल


 



इकबाल चहल यांनी दिलेले आदेश खालीलप्रमाणे
* आजपासून आयुक्त इकबालसिंग चहल कुठल्याही वॉर्डमध्ये अचानक भेट देऊन पाहणी करणार
* 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' चे काम आणखी प्रभावीपणे आणि नियोजनपूर्वक होणे गरजेचे. सध्या हे प्रमाण एका बाधित रूग्णाच्या मागे ३ इतके असून ते ६ पर्यंत न्यावे. यात अतिधोकादायक संपर्कांचा कसून शोध घेतला जावा. झोपडपट्ट्यांमधील असे संपर्क लगेच संस्थात्मक अलगीकरण केंद्रात स्थलांतरीत करावे.
* वॉर्ड ऑफिसरनी त्यांच्या कार्यक्षेत्रात महापालिकेची जी रुग्णालये येतात, त्या रुग्णालयांमधील कार्यवाहीवर लक्ष ठेवणे व तेथील व्यवस्था अधिकाधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देऊन अपेक्षित कार्यवाही करवून घेणे.
* एखाद्या विभागातील रूग्णालयात जागा नसल्यास, ज्या विभागात व्यवस्था होऊ शकते, अशा अन्य विभाग क्षेत्रातील रुग्णालयात पाठविण्याची कार्यवाही करावी
* 'कंटेनमेंट झोन' विषयक कार्यवाहीकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे. तसेच या क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची तपासणी (screening) व्हायला हवी.प्रत्येक 'कंटेनमेंट झोन' साठी समन्वयक म्हणून कोविड योद्ध्यांची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात करावी.
* महापालिका क्षेत्रातील १०० कोविड केंद्रांवर प्रत्येकी दोन याप्रमाणे २०० रुग्णवाहिकांचे नियोजन करण्याचे निर्देश