मुंबई : जसजशी कोरोनाबाबत चाचणी वाढत आहे, तसतसे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या ३६तासात  मुंबईत ८२ रुग्णांची वाढ झाली आहे. तर पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधीतांची संख्या ७१४ वर गेली आहे. राज्यभरात मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असून, त्याखालोखाल पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १८९ वर गेलीय. गेल्या ३६ तासांत पुण्यात कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झालाय. नाशिकच्या मालेगावध्ये पाच रुग्ण नव्याने आढळले आहेत. तर बुधवारी सकाळी ज्या रुग्णांचा मृत्यू झाला होता त्याचे रिपोर्ट्सही पॉझिटिव्ह आले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यामध्ये काल संध्याकाळनंतर आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे पुण्यातील एका दिवसातील कोरोना बळींचा आकडा आता दहा झाला आहे. तर एकूण मृतांची संख्या अठरावर गेली आहे. बुधवारी दिवसभरात पुण्यात कोरोनाचे नवे २७ रुग्ण आढळून आले. तर पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १९७ इतकी झाली आहे. 



 
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये पाच कोरोनाबाधित आढळले आहेत. काल उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झाले आहे. तर काल सकाळी ज्या रुग्णाचा मृत्यू झाला त्याचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊनच त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी केले जाणार आहेत. तर इतर चार कोरोनाबाधित रुग्णांवर मालेगावमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यात एकूण ७ कोरोना बाधित असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.