दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात अर्भकांच्या मृत्यूत वाढ झाली असून मागील वर्षी राज्यात १६ हजार ५३९ अर्भकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब विधानसभेत समोर आली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अर्भकांच्या मृत्यूचा आकडा १७६३ इतका आहे. राज्याच्या एचएमआयएसच्या अहवालानुसार २०१८-१९ या वर्षात हे मृत्यू झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जंतुसंसर्ग, न्युमोनिया, जन्मता कमी वजन, जन्मता श्वासारोध या कारणांमुळे हे अर्भक मृत्यू झाल्याचं शिंदे यांनी या लेखी उत्तरात नमूद केलं आहे. राज्याच्या एचएमआयएसच्या अहवालानुसार सन २०१६-१७ मध्ये १० हजार ३४८ अर्भक मृत्यू, तर २०१७-१८ मध्ये १३ हजार ६९ अर्भकांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे. 


राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहिमेंतर्गत राज्यातील अर्भक मृत्यूदर १० पर्यंत खाली आणण्याचे उद्दीष्ट राज्य सरकारने निश्चित केलेले असतानाही राज्यात अर्भक मृत्यूदराचे प्रमाणजास्त आहे. इन्क्युबेटर, व्हेंटीलेटरसह वैद्यकीय सुविधा व तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे राज्यात नवजात बालकांच्या मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन कोणत्या उपाययोजना करत आहे, असा लेखी प्रश्न विरोधकांनी विधानसभेत विचारला होता. त्याला सरकारने दिलेल्या लेखी उत्तरात राज्यातील हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.