दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन त्यानुसार मुंबई महापालिकेतील प्रभागांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र यासंदर्भातील वटहुकूमावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपालांनी या वटहुकूमावर स्वाक्षरी केल्याने आता मुंबई महापालिकेतील प्रभागांच्या संख्येत वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला असून नगरसेवकांची संख्या 227 वरून 236 होणार आहे. 


राज्यातील महानगरपालिकांमधील नगरसेवकांची संख्या वाढवून त्यानुसार प्रभाग रचनेत बदल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने दिवाळीपूर्वी घेतला होता. इतर महानगरपालिकांमधील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा वटहुकूम काढण्यास राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी लगेचच मंजुरी दिली होती.


मात्र मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी वटहुकूम काढण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. सोमवारी राज्यपालांनी त्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर नगरविकास विभागाने हा वटहुकूम जारी केला आहे. 2001 ते 2011 या कालावधीत मुंबईतील लोकसंख्या 3.87 टक्क्यांनी वाढल्याचं 2011 च्या जनगणना अहवालातून स्पष्ट झालं आहे. 


त्यामुळे वाढीव लोकसंख्येला त्याप्रमाणात मुंबई महानगरपालिकेत प्रतिनिधित्व मिळावे यासाठी मुंबई महानगरपालिकेतील सदस्य संख्या वाढवण्यात येत असल्याचे या वटहुकूमात नमूद करण्यात आलं आहे.