कोरोना रूग्णांची संख्या वाढली तर... उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला इशारा
गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ
मुंबई : कोरोना (Corona) संदर्भातली सर्वात मोठी बातमी. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत राहिली तर नियम बदलावे लागतील असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोना रूग्णांची संख्या सातत्यानं वाढतेय.
आज राज्यात कोरोनाचे 536 नवे रूग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी हीच रूग्णसंख्या 100 होती. आता पुन्हा एकदा रूग्णसंख्या वाढताना दिसतेय. रूग्णवाढ अशीच होत राहिली तर पुन्हा कोरोनाचे निर्बंध लागू शकतात शिवाय मास्कसक्तीचे नियमही बदलू शकतात, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ
मुंबईत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसतायत. शुक्रवारी मुंबईत 352 नव्या रुग्णांची नोंद झाली. दिलासादायक म्हणजे गेल्या चोवीस तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात 213 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 1797 सक्रिय रुग्ण आहेत.
जगभरात कोरोनाचे वाढते रुग्ण
एका आठवड्यात जगात कोरोनाचे तब्बल ३७ लाख रुग्ण आढळलेत. तर ९ हजार जणांचा मृत्यू झालाय. जूनमध्ये ओमायक्ऱॉनचं म्युटेशन होऊन कोरोनाची नवी लाट येऊ शकते, असा इशारा WHO नं दिलाय. चीन, अमेरिका आणि मिडल इस्टमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढतेय.