नौदलाची `तेजस` कामगिरी, आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठं पाऊल
भारतीय नौदलाची ऐतिहासिक कामगिरी, विमानवाहू युद्धनौकेवरुन तेजस विमानांची यशस्वी लँडिंग आणि टेकऑफ
अमित भिडे, सीनियर प्रोड्युसर, मुंबई : भारतीय नौदलाने (Indian Navy) आज आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली. नौदलाने काही महिन्यांपूर्वीच संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत (INS Vikrant) ही विमानवाहू युद्धनौका ताफ्यात दाखल केली. या विमानवाहू युद्धनौकेवरून प्रथमच तेजस विमानांनी लँडिंग आणि टेकऑफ केलं. विशेष म्हणजे तेजस ही फायटर जेट्सही (Tejas Fighter Jets) संपूर्ण भारतीय बनावटीची आहेत.
नौदलासाठी तेजसच्या विमानांमध्ये खास बदल करण्यात आलेत. नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकांच्या अतिशय छोट्या आकाराच्या धावपट्टीवरून लँडिंग आणि टेकऑफ करण्यासाठी त्यात अनेक तांत्रिक बदल केले आहेत. याआधी भारताच्या विमानवाहू युद्धनौकांच्या ताफ्यात रशियन बनावटीची मिग 29 के (Mig 29 K) जातीची विमानं होती. भारतीय बनावटीची तेजस विमानं विक्रांतवर यशस्वीरित्या उतरवल्यामुळे आत्मनिर्भर भारत अंतर्गत एक मोठं पाऊल भारताने टाकलंय.
संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आणि त्यावरील लढाऊ विमानांचा संपूर्ण भारतीय बनावटीचा ताफा हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. विक्रांतवरील विमानांच्या ताफ्यासाठी याआधी फ्रान्सची राफेल (Raphael) आणि अमेरिकेच्या एफ ए 18 सुपर हॉर्नेट या विमानांच्या चाचण्या झाल्या आहेत. राफेल एम व्हेरियंटला नौदलाची पसंती असल्याची माहिती आहे. त्यातच आता भारतीय तेजस विमानांच्या यशस्वी चाचणीने भारतीय लष्करी संशोधन क्षेत्रात मोठ्या संधी आणि अपेक्षा निर्माण केल्या आहेत.
तेजस विमानं याआधीच वायुदलात दाखल झाली आहेत. आता भारताचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेली ही विमानं नौदलाच्या ताफ्यात आल्यास परदेशी महागडी विमानं घेण्याचा भारताचा खर्चही कमी होईल. तेजस विमानं विकत घेण्याची इच्छा याआधीच अनेक देशांनी व्यक्त केलीय. या यशस्वी चाचण्यांमुळे संरक्षण उत्पादनं निर्यात क्षेत्रात भारताला आणखी एक नवं आकाश उपलब्ध होईल..