देशात महिला पोलिसांची संख्या किती? 9 राज्यात वाईट अवस्था... महाराष्ट्रात काय स्थिती
Women Police in India : भारतात 28 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत. पण यात महिला पोलिसांची संख्या 10 टक्क्यांहून कमी आहे. महिलांसाठी आरक्षण केवळ कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर पदांसाठी लागू होतं.
Women Police in India : कोलकाताच्या आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकारने महिला आणि लहान मुलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी राज्यात विशेष 'अपराजिता टास्क फोर्सची' स्थापना केली. या पथकात केवळ महिला पोलीस अधिकारी असणार आहेत. देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या तुलनेत महिला पोलिसांची (Women Police) संख्या खूपच कमी आहे. पश्चिम बंगालमध्ये महिला पोलिसांची संख्या केवळ 9.6 इतकी आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे.
महिला पोलिसांची कमतरता
पोलीस विभागात महिलांची संख्या जास्त असल्यास पीडित महिला तक्रारदारांच्या समस्या कमी होतील आणि महिला पोलीस या तक्रारी गांभीर्याने घेतील असं तज्ज्ञ सांगतात. देशात 2017 ते 2022 दरम्यान महिला पोलिसांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. पण अद्याप म्हणावी तशी यात वाढ झालेली नाही.
देशात महिला पोलिसांची संख्या किती?
ब्यूरो ऑफ पोलीस रिचर्स अँड डेव्हलपमेंटच्या (BPR&D) रिपोर्टनुसार 1 जानेवारी 2023 पर्यंत देशात एकूण 21.41 लाख पोलीस कर्मचारी आहेत. यात 14.31 लाख सिव्हिल, 2.39 लाख जिल्हा सशस्त्र राखीव पोलीस, 3.32 लाख राज्य विशेष सशस्त्र पोलीस, 1.40 लाख राखीव बटालियन (IRB) आहेत
देशभरात एकूण 27 लाख 22 हजार 669 पदं मंजूर असून, यापैकी तब्बल 5 लाख 51 हजार 364पदे रिक्त आहेत. राज्य विशेष सशस्त्र पोलीस दलात 63,078 पदे, राखीव बटालियन (IRB) मध्ये 28,552, जिल्हा सशस्त्र राखीव पोलीस दलात 86,865 आणि सिव्हिल पोलिसांमध्ये 4,02,869 पदे रिक्त आहेत.
महिला पोलिसांची संख्या किती?
ब्यूरो ऑफ पोलीस रिचर्स अँड डेव्हलपमेंटच्या (BPR&D) रिपोर्टनुसार 1 जानेवारी 2023 पर्यंत देशात 2 लाख 63 हजार 762 महिला पोलीस आहेत. यात सिव्हिल, डीएआर, स्पेशल आर्म्ड आणि आयआरबी यांचा समावेश आहे. देशातील एकूण पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 12.32% महिला पोलीस आहेत. हा दर 2549 महिलांमागे एक महिला पोलीस असा आहे.
2021 मध्ये 2 लाख 46 हजार 103 महिला पोलिसांच्या तुलनेत 2023 मध्ये ही संख्या 7.18% टक्क्यांनी वाढली. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एकूण 42,986 महिला पोलीस आहेत. यात सर्वाधिक महिला पोलीस या सीआयएसएफमध्ये आहेत. CISF मध्ये 10,001 महिला पोलीस आहेत.
कोणत्या राज्यात सर्वात जास्त महिला पोलीस
ब्यूरो ऑफ पोलीस रिचर्स अँड डेव्हलपमेंटच्या रिपोर्टनुसार सर्वात जास्त 33,319 महिला पोलीस उत्तर प्रदेशमध्ये आहेत. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्रात महिला पोलिसांची संख्या 32,172 इतकी आहे. तामिळनाडू (25,334), बिहार (24,295), आंध्र प्रदेश (18,913), गुजरात (14,745), दिल्ली (11,930)मध्ये महिला पोलिसांची संख्या आहे.
केंद्र शासित प्रदेशाचा विचार केला तर लढाखमध्ये सर्वात जास्त म्हणजे 29.65% इतक्या महिला पोलीस आहेत. लढाखमध्ये एकूण 2621 पोलीस आहेत. यात 777 महिला पोलीस आहेत. याशिवाय लक्ष्यद्वीप (26), दादर आणि हवेली (104), पुद्दुचेरी (268), सिक्किम (470), अंदमान निकोबार (543) यांचा समावेश आहे.
कोणत्या राज्यात सर्वात कमी महिला पोलीस
देशातील काही राज्यात महिला पोलिसांची संख्या 10 टक्क्यांहून कमी आहे. यात जम्मू आणि कश्मीर, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, आसम, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगढ़, मिझोरम, सिक्किम, केरळ, तेलंगाना, कर्नाटक, हरियाणा, दादर आणि नागर हवेली आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.