मुंबई: भिन्न विचारसरणीच्या तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतील कुरबुरी काही थांबायला तयार नाहीत. तीनपैकी एका पक्षाचा नेता काहीबाही विधान करतो मग त्यावर इतर पक्ष नाराज होतात, यानंतर सारवासारव केली जाते, हा महाविकास आघाडीसाठी जणू नित्यक्रमच झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी शिवसेनेसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला होता. यादरम्यान तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना टोले-प्रतिटोले लगावले. हा वाद कुठे संपतो ना तोच आता जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्यावर टीका करून पुन्हा नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.


जितेंद्र आव्हाड बुधवारी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव महासभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, इंदिरा गांधी यांनीही देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्याविरोधातही बोलायला कोणीही तयार नव्हते. अखेर अहमदाबाद आणि पाटण्यातील विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन करायला सुरुवात केली. यामधूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले आणि पुढे इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. महाराष्ट्रात आणि देशात याच इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. 



या सभेला माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील, तिस्ता सेटलवाड, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना अबू तालिब रहेमानी, ‘जेएनयू’ची विद्यार्थिनी दीपशिखा धर आदी उपस्थित होते. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे आता काँग्रेस पक्ष नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.