आज संपूर्ण देशभरात दिवाळी  साजरी केली जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने आज शेअर बाजाराला तशी सुट्टी असते. पण आजच्या दिवशी एक ट्रेडिंगची खास परंपरा असते. याला मुहूर्त ट्रेडिंग असं म्हणतात. यासाठी फक्त एका तासासाठी शेअर मार्केट खुलं केलं जातं. या एका तासात गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करत मार्केटमधील परंपरा कायम ठेवतात. असं म्हटलं जातं की, या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगमुळे समृद्दी येते आणि संपूर्ण वर्षभर गुंतवणुकदारांना आर्थिक लाभ होतो. 


तिन्ही मार्केट्समध्ये होते ट्रेडिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीच्या दिवशी हे मुहुर्त ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करन्सी अँड कमोडिटी मार्केट या तिन्ही प्रकारात होते. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6 ते 6.15 पर्यंत असणार आहे. तर मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6.15 ला सुरु होईल आणि 7.15 पर्यंत सुरु राहील. प्रत्येक वर्षी मुहूर्त ट्रेडिंगला छोटे-मोठे गुंतवणूकदार काही ना काही गुंतवणूक करतात आणि यानिमित्ताने वर्षभर त्यांच्या खिशात पैसा खेळता राहील अशी आशा व्यक्त करतात. गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा कायम आहे. 


पाच दशकं जुनी परंपरा


शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एका तासासाठी मुहूर्त ट्रेडिंगची ही परंपरा पाच दशकं जुनी आहे. मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये1957 आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये 1992 मध्ये सुरु झाली होती. अनेक गुंतवणूकदार या दिवशी शेअर खरेदी करतात. ही गुंतवणूक फार छोटी आणि प्रतिकात्मक असते. 


मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार आणि ब्रोकर्स मूल्य आधारित स्टॉक खरेदी करतात, जे दीर्घकाळासाठी चांगले असतात. गुंतवणूकदारांच्या मते या दिवशी खरेदी करण्यात आलेले शेअर्स भाग्यवान म्हणून ठेवले जातात. अनेकदा हे शेअर्स पुढील पिढीपर्यंत ठेवले जातात. दिवाळीत नवी गोष्ट सुरु करण्याच्या हेतूने याकडे पाहिलं जातं. अशात अनेक गुंतवणूकदार या विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्रात शेअर बाजारात गुंतवणूक करणं पसंत करतात. 


गेल्या 10 वर्षातील मुहूर्त ट्रेडिंगमधील गुंतवणूकदारातील आकडेवारी पाहिली तर शेअर बाजारने 8 वेळा गुंतवणूकदारांना फायदा दिला आहे. तर 2 वेळा सेन्सेक्स आणि निफ्टीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं नुकसान केलं आहे. गतवर्षी 2022 मध्ये मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी सेन्सेक्स 524.5 वर पोहोचून बंद झाला होता. 


(नोट - शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी मार्केट तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)