मुंबई : ३१ जणांचा बळी गेलेल्या मुंबईतल्या मालाड दुर्घटनेत कुणीही दोषी नसल्याचं चौकशी अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ९ जणांच्या तांत्रिक चौकशी समितीने अहवाल सादर केला. या अहवालात कुणालाही दोषी धरण्यात आलेलं नाही. ३१ जणांचा बळी गेल्यानंतरही अधिकारी आणि कंत्राटदारांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालाड पूर्वमधल्या कुरार व्हिलेजमध्ये मध्यरात्री काळाने घाला घातला. महापालिकेच्या जलवितरण विभागाची संरक्षण भिंत पिंपरीपाडा आणि जांभोशीनगर या दोन वस्त्यांवर कोसळली. या अपघातात कित्येक कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली. दोन वर्षांपूर्वीच ही बांधली होती. मात्र दुर्घटनेनंतर भिंतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याची बाब समोर आली. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. 


पावसाचं जास्त झालेलं प्रमाण आणि त्यामुळे साचलेल्या पाण्याचा दबाव वाढून भिंत कोसळल्याचं अहवालात म्हटलंय. पाणी वाहून नेण्यासाठी मोठी गटारं नसल्यानं पाणी साचल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मग असं असेल तर ही गटार न बांधण्याला कुणीतरी जबाबदार असेलच त्याचा मात्र उल्लेख या अहवालात करण्यात आलेला नाही.


३५ फूट उंचच्या उंच भिंत बांधत असताना त्याची रूंदी मात्र केवळ २ फूटच ठेवण्यात आली होती. दोन वर्षापूर्वीच बांधलेली संरक्षक भिंत कोसळल्याने, भिंतीचं बांधकाम निकृष्ट झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. यापूर्वी तिथे दगडी भिंत होती, जी ४० वर्षात कधी कोसळली नाही. परंतु महापालिकेनं बांधलेली काँक्रीट भिंत तीन वर्षातच जमीनदोस्त झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली होती.