मुंबई : उदयपूरमधला भव्य पॅलेस पाहून तुम्ही थक्क व्हाल. या ठिकाणी  प्री-वेडिंग सेलिब्रेशन पार पडले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पाहुणे मंडळींचा लवाजमा आणि सोबतीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी. आम्ही बोलतोय इशा अंबानी-आनंद पिरॅमल यांच्या शाही विवाहसोहळ्याबद्दल. स्वप्नवत असावा असा हा विवाहसोहळा. आणि खर्चही तेवढाच महागडा. अंबानी कुटुंबियांची राजकुमारी इशाचा हा विवाहसोहळा सदैव सगळ्यांच्याच लक्षात राहिल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आनंदने इशाला महाबळेश्वरमध्ये लग्नाची मागणी घातली आणि गेल्या सात महिन्यांपासून या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. अगदी एंगेजमेन्ट पार्टीपासून ते उदयपूरमध्ये झालेल्या हळद, संगीत सेरेमनीपर्यंत सगळ्याच गोष्टींची चांगलीच चर्चा रंगलीय.



मुकेश अंबानींच्या एकुलत्या एक मुलीचा विवाह किती थाटात होईल, कुठे होईल याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अखेर तो दिवस आला. अॅंटिलिया या अंबानींच्या शाही राजवाड्यातच शाही पाहुण्यांच्या साक्षीने एक शाही विवाह जगाने पाहिला.



उदयपूरमधील भव्य पॅलेसमध्ये इशाची हळद आणि संगीत सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं होतं..हिलरी क्लिंटनपासून तर किंग खान शाहरुख, सलमान खानपर्यंत अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. अंबानी यांनी उदयपूरला येणाऱ्या पाहुण्यांसाठी 100 चार्टर्ड विमानं भाड्याने घेतली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटनदेखील सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. याआधी अंबानी कुटुंबाने 5100 लोकांच्या तीन वेळ जेवणाची व्यवस्था केली होती.


या शाही विवाह सोहळ्यासाठी जवळपास एक हजार कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. ब्रिटनचा राजकुमार हॅरी व मेगनच्या लग्नापेक्षाही हा खर्च जास्त असावा. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नासाठी 100 कोटींच्या आसपास खर्च आला आहे. 



तसं पाहायला गेलं तर इशा आनंद यांच्या लग्नाचा सोहळा मे महिन्यापासूनच सुरु झाला होता. लग्न ठरल्यानंतर एका भव्य पार्टीचं आयोजन अँटिलियावर करण्यात आलं होतं. या पार्टीत नवराई माझी लाडाची गं ..म्हणत नीता अंबानी यांनी ठेका धरला तर इशा सोबत नच दे सारे या बार बार देखो मधील गाण्यावर त्या थिरकल्या. काही इमोशनल गाण्यांची मैफलही यावेळी रंगली. या संगीत सोहळ्याचं मुख्य आकर्षण होती ती ग्लोबल सेंसेशन बियॉन्से...ती आली तिने पाहिलं तिने जिकलं असाच काहीसा तिचा परफॉरमन्स होता. भारतीय डिझायनर फाल्गुनी शेन पिकॉक, अबु जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेले ड्रेस बियॉन्सेसाठी तयार ठेवण्यात आले होत. काही तासांच्या अशा कार्यक्रमासाठी बियॉन्से जवळपास कोट्यवधी रुपये फी आकारते. अर्थात हे लग्न होतं इशा अंबानीचं. या सोहळ्याला हिलरी क्लिंटन यांच्यासह आतंरराष्ट्रीय पाहुण्यांनी हजेरी लावली.



इशा आनंदचा साखरपुडा सप्टेंबरमध्ये अत्यंत खासगी पद्धतीने इटलीच्या लेक कोमो इथे झाला. बॉलिवूडमधील काही ठराविक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. लेक कोमो हे ठिकाण अंत्यत महाग समजलं जातं. येथील विलाचं एका दिवसाचं भाडं किमान दहा लाख रुपये असून पाहुण्यांच्या संख्येवर इतर खर्च असतो..  तीन दिवस हा साखरपुडा समारंभ चालला. इटलीतील जगातील नामवंत फॅशन ब्रॅण्ड डोल्स गबाना या डिझायनरच्या दुर्मिळ कलेक्शनमधील क्रिस्टल एब्रॉयडरी केलेला महागडा गाऊन इशाने परिधान केला होता. आपल्या मुलीला आनंदच्या दिशेने घेऊन येत तिचा हात मुकेश अंबानी यांनी आनंदच्या हातात सोपवला.. एखाद्या परिकथेतील भासावा तसंच होतं सर्व काही. 



अंबानी आणि पिरामल कुटुंब


शाहरुख, सलमान अगदी करण जोहरनेही या सोहळ्यात ताल धरला. शाहरुखनं आपली पत्नी गौरीसोबत केलेल्या धमाल नृत्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. तर बॉलिवूडमध्ये आपल्या दबंगगिरीसाठी ओळखला जाणारा सलमान खान चक्क अनंत अंबानीचा कोरस डान्सर बनला होता. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.


अभिषेक ऐश्वर्याच्या जोडीनं आपल्या गाजलेल्या गुरु या चित्रपटातील गाण्यावर यावेळी ताल धरला. यामध्ये सर्वाधिक रंगला तो दीपिका आणि ऐश्वर्याचा धमाल डान्स. ऐश्वर्या-दीपिकाच्या या हटके डान्सवर तुम्हीही ताल धराल. इशाच्या हळदीच्या निमित्तानं सेलिब्रिटीही तितक्याच उत्साहाने हा सगळा माहौल एन्जॉय करत होते. रणवीर-दीपिका या नवविवाहित दाम्पत्यानंही आपल्या धमाल नृत्यानं या पार्टीला चार चाँद लावले. रणवीर-दीपिकानं बेभान होऊन या पार्टीत शानदार नृत्य केलं. एकूणच काय तर भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या या शाहीसोहळ्याची चर्चा बराच वेळ रंगेल यात शंकाच नाही.