मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात नवी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. याचदरम्यान गुरुवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठापासून राजघाटापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत अज्ञाताने गोळीबार केला. यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. सत्ताधीशांना विरोध सहन होत नाही, आजही गोडसे जिवंत आहेत अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही विरोधात देशभरात जनता शांत व शिस्तबद्धपद्धतीने आंदोलन करत आहे, आपली भूमिका मांडत आहे. मात्र आजच्या सत्ताधीशांना विरोध काही सहन होत नाही. धर्मांध शक्तींचे हस्तक गोळीबार करत आहेत. विरोध होतोय म्हणून केंद्र सरकारने चिडून जाऊ नये. लोक शांतपणे आंदोलन करत आहेत त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, त्यांना संरक्षण द्या, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.


दरम्यान, पुण्यात उर्मिला मातोंडकर यांनी टीका केली आहे. जे इथे बाहेर घोषणा देत आहेत. रस्त्यावर उतरले आहेत त्यांच्या नेत्यांना आज राजघाटावर जावे लागत आहे, हीच महात्मा गांधी यांची ताकद असल्याचे सांगत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी नाव न घेता हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली. CAA कायदा हा काळा कायदा आहे, म्हणून त्याला विरोध असल्याचे मातोंडकर म्हणाल्यात. जात-पात धर्म भाषा प्रदेश यावर आपले संविधान विरोध करत नाही. हा कायदा मुस्लिम विरोधी आहेच पण गरिबांच्या विरोधी पण आहे. १५ टक्के मुस्लिमांकडून ८५ टक्के बहुमताला धोका आहे, असे भासवले जात आहे. सगळ्या गोष्टी हिंदू-मुस्लिम या पातळीवर आणून ठेवले जात आहे, असे मातोंडकर म्हणाल्या.