मांढरे, झी मीडिया, मुंबई : मुंबई हे अंमली पदार्थांचं जागतिक केंद्र झालंय. त्यामुळे कोणतंही नवं ड्रग तयार झालं की त्याचा पहिला प्रयोग मुंबईत होतोय. अशाच एका नव्या अंमली पदार्थाने मुंबईत प्रवेश केलाय. त्याचं नाव आहे झोल टाईम... 


झोल टाईम ड्रग्ज तरूणात लोकप्रिय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'उडता पंजाब' या सिनेमात पंजाबची तरूणाई कशी अंमली पदार्थांच्या आहारी गेलीय त्याचं चित्रण तुम्ही पाहिलं असेल... मुंबईतही काहीशी अशीच स्थिती आहे. मुंबई हे देशातील अंमली पदार्थ तस्करी, विक्री, खरेदीचं केंद्र झालंय. त्यामुळे मुंबईतली तरूणाई या अंमली पदार्थांच्या जाळ्यात पहिली अडकते. एमडी ड्रग्जनंतर आता 'झोल टाईम' या अंमली पदार्थाने तरूणाला विळखा घातलाय. मुंबईतल्या पार्ट्यांमध्ये हे झोल टाईम ड्रग्ज प्रसिद्ध झाल्याचं उघड झालंय. झोलटाईमच्या तस्करीप्रकरणी एनसीबीने एकाला अटक केलीय. 


'झोल टाईम' या ड्रग्सची मागणी मुंबईसह अमेरीका, इंग्लंड आणि युरोप खंडात जास्त आहे. त्यामुळे कलकत्ता ते मुंबई, मुंबई ते युरोप खंड अशी झोल टाईमची तस्करी केली जाते. कारण युरोपसह जगभरात या ड्रग्सवर कडक निर्बंध आहेत. या ड्रग्सला एका औषधाच्या नावावरून झोल टाईम हे नाव पडलंय.  


यंत्रणेची उडाली झोप


युरोपात झोलपेडीयम नावाचं प्रतिबंधात्मक औषध आहे. डॉक्टरांच्या परवानगीने हे औषध दिलं जातं. गाढ झोप येण्यासाठी हे औषध दिलं जात होतं. पण युरोपीय देशात या औषधांच्या गोळ्यांचा वापर नशा करण्यासाठी होऊ लागला. पार्ट्यांमध्ये या गोळ्यांचा खच सापडू लागला. त्यामुळे हे ड्रग प्रतिबंधीत करण्यात आलं. अमेरिका, युरोपमध्ये झोलपेडियमवर बंदी आहे. भारतात याबाबत जागरूकता नसल्याने आशिया खंडासह भारतात याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ लागलाय. 


झोलपेडियम या औषधापासून हे ड्रग बनतंय. खूप जास्त काळ याचा अंमल शरिरावर राहतो. त्यामुळे याला 'झोल टाईम' असं नाव पडलं. हे ड्रग घेतल्यावर ७ ते ८ तास परिणाम राहतो. शरीरावर कंट्रोल राहात नाही. एका कोपऱ्यात पडून राहावसं वाटतं. भूक लागत नाही. शरीर सूस्त होतं. ड्रगच्या सेवनानंतर आपण वेगळ्याच दुनियेत आहोत असं वाटत राहतं. 


'झोल टाईम' सध्या एमडी ड्रग्जपेक्षा अर्ध्या किंमतीत मिळतंय. या अंमल मात्र एमडी ड्रगपेक्षा जास्त आहे. एनसीबीने आता मुंबई पोलिसांच्या मदतीने या झोल टाईमची पाळंमुळं खोदायला घेतली आहेत.