मुंबई: काही दिवसांपूर्वीच कोरोनावर यशस्वीपणे मात करून रुग्णालयातून घरी परतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ट्विटरवर एका युजरकडून धमकी देण्यात आल्यामुळे आव्हाड चांगलेच संतापले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण कोरोनातून बरे झाल्याचे ट्विट केले होते. यावर एका युजरने आक्षेपार्ह कमेंट केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून म्हटले होते की, भिडे गुरुजी आणि मंडळी वाट बघत आहेत तुमची. त्यामुळे घराच्या बाहेर पडू नका, असे म्हटले होते.  यानंतर आव्हाड यांनी याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार गंभीर नाही का? याची दखल कोण घेणार? ही थेट जीवे मारण्याची धमकी आहे. मला आशा आहे की, संबंधित यंत्रणा याची दखल घेतील, असे जितेंद्र आव्डाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 


'आव्हाडांनी त्याला मारलं ते चांगलंच केलं, विकृती ठेचलीच पाहिजे'


काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी एका व्यक्तीला बंगल्यावर बोलावून मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी केलेल्या दीपप्रज्वलनाच्या आवाहनावर आव्हाड यांनी टीका केली होती. यानंतर सिव्हिल इंजिनीअर अनंत करमुसे (४०, रा. आनंदनगर, घोडबंदर रोड) यांनी आव्हाड यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. त्यामुळे अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, आव्हाड यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.