बाबासाहेब पुरंदरेंच्या `पद्मविभूषण`ला विरोध, जितेंद्र आव्हाड महाराष्ट्र `पेटवणार`
शिवचरित्रकार आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई : शिवचरित्रकार आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीत शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रातून त्यांना मिळालेल्या या पुरस्काराला विरोध सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरेंना मिळणाऱ्या या पुरस्काराला विरोध केला आहे.
छत्रपतींच्या इतिहासासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. महाराजांची बदनामी करणाऱ्याला सरकार पोसतंय, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. तसंच शिवसन्मान परिषदा घेऊन महाराष्ट्र पेटवणार असल्याचं आव्हाड म्हणाले. पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्यात आल्याची भावना आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.
'पद्मविभूषण ने सन्मानित केले पुरंदरेंना. जखमी केले जगातील शिवप्रेमींना ज्यांनी केली महाराष्ट्राच्या अस्मितेची बदनामी ते ह्या मनुवादी सनातन्यांचे मुकुटमणी', असं ट्विट आव्हाड यांनी केलं.
याआधी २०१५ साली बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यावेळीही जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांना हा पुरस्कार द्यायला विरोध केला होता.
बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण
केंद्रातल्या मोदी सरकारनं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवकालीन इतिहासाचे संशोधन आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वेचले. शिवकालीन इतिहासावर त्यांनी लिहलेली पुस्तके चांगलीच गाजली होती. त्यांच्या लेखणीतून उतरलेले 'जाणता राजा' हे नाटकदेखील रंगभूमीवर तुफान लोकप्रिय झाले होते. त्यांच्या याच कार्याचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यापूर्वी राज्य सरकारने २०१५ मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला होता.
पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, पद्मविभूषण जाहीर झाल्याचे कळताच खूप आनंद झाला. मानाचा किताब जाहीर होईल, याची कल्पना नव्हती. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अभ्यासकांचा हा गौरव आहे. त्यांच्याबद्दल व्यक्त केलेले हे प्रेम आहे, असे पुरंदरे यांनी म्हटले.