कल्याणचा गोविंदवाडी पूल बनला मृत्यूचा सापळा; पुलावरुन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू
Kalyan Accident : कल्याणमध्ये विचित्र अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुलावरुन थेट खाली कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याणमध्ये विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये पुलावरुन पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कल्याणच्या गोविंदवाडी बायपास ब्रिजवर हा अपघात घडला आहे. या ब्रिजवर गाडीने धडक दिल्याने खाली पडून अंकुश ढगे या तरुणाचा मृत्यू झालाय. त्यामुळे कल्याणचा गोविंदवाडी बायपास पूल हा मृत्यूचा सापळा बनतोय.
कल्याणचा गोविंदवाडी बायपास पुलावर घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. या पुलावर अनेक ठिकाणी वळण आहेत. याशिवाय पुलाच्या संरक्षक भिंतीची उंची कमी असून तिला संरक्षक जाळ्या नाहीत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुलाला संरक्षक जाळ्या तात्काळ बसवाव्या अशी मागणी स्थानिकांनी केलीय.अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलाय.अंकुश या पुलावरून जात असताना तो बाईकवरुन घसल्याने खाली पडला. त्यामुळे तो 40 फूटांवरुन पुलाखाली पडला. स्थानिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्याचा त्याआधीच अंकुशचा मृत्यू झाला होता. अंकुश हा घरातील एकमेव कमवणारा होता. मात्र आता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटूंबाचा आधार हरपला आहे.
"अंकुश पुलावरुन येत असताना त्याची बाईक घसरली आणि तो खाली पडला. याआधी देखील पुलावरुन पडून एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे माझी इच्छा आहे की, प्रशासनाने यासाठी उपयोजना करायला हव्यात. कुणासोबतही असं व्हायला नको. कारण घरी लहान मुले असतात. त्यांचे पालन कोण करणार? त्यामुळे या पुलाला शेजारी जाळ्या लावायला हव्यात," असे महिंद्र ढगे यांनी सांगितले.
"हा बायपास रोड झिकझॅक पद्धतीने बनवण्यात आला आहे. त्यामुळे आजूबाजूला सुरक्षेसाठी जाळ्या लावल्या नाहीत. पथदिवे देखील नाहीत. पुलाच्या घरं आहेत. पुलावरुन गाडी घरावर कोसळली तर मोठा अपघात होऊ शकतो. अंकुशदेखील पुलावरुन खाली पडला. त्याच्या घरी तीन लहान मुली आहेत. त्याच्या घरात कमावणारा तो एकटाच होता. आतापर्यंत 14 जणांचा अशा प्रकारे अपघात झाला असून त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आमची सरकारकडे मागणी आहे की पुलावर सुरक्षेसाठी जाळ्या लावण्यात याव्यात," असे एका स्थानिक नागरिकानं सांगितले.