`शिंदे गटाचे महेश गायकवाड शांत बसलेले असताना...`; पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं पोलिसांनीच सांगितलं
BJP MLA Ganpat Gaikwad Shooting : उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.
BJP MLA Ganpat Gaikwad Shooting : भाजपाचे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या गोळीबारात शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा कार्यकर्ता राहुल पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसरीकडे गणपत गायकवाड यांनी मुलाला मारहाण झाल्याने आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचे म्हटलं आहे. मात्र पोलिसांनी कोणालाही मारहाण झाली नाही आणि गणपत गायकवाड यांनी शांत बसलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या असे म्हटलं आहे.
अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वादातून हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे पुत्र वैभव हे उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या समोर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यावेळी आमदार गायकवाड यांनी महेश यांच्यावर गोळीबार केला. यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ठाणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी गणपत गायकवाड यांनी पाच राऊंड फायर केल्याचे म्हटलं जात आहे. सध्या गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली असून पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे कल्याण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
"गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघेही तक्रार देण्यासाठी आले होते. दोघांमध्ये काही चर्चा सुरु होती. त्यादरम्यान अचानाक आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्याने गोळीबार केला आहे. त्यात दोघे जखमी झाले आहेत," अशी माहिती उल्हासनगरचे पोलीस उपाआयुक्त सुधाकर पाठारे यांनी दिली.
"हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत गंभीर घटना घडली. जखमीवर अग्निशस्त्रातून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मूळ घटना द्वारली गावातील जमिनीच्या वादातून झाली. ही जागा एकनाथ जाधव यांची आहे. त्या जमिनीच्या वादातून ही घटना घडली. दोघांविरोधात तक्रार आल्याने दोन्ही गट इथे आले होते. त्यावेळी आमदार गणपत गायकवाड, महेश गायकवाड आणि राहुल पाटील आणि चैनु जाधव तिथे आले होते. त्यावेळी गणपत गायकवाड यांनी अचानक गोळीबार केला. आतापर्यंत सहा गोळ्या जखमींच्या शरीरातून काढण्यात आल्या आहेत. बाहेर दोन्ही गटाचे लोक आरडाओरडा सुरु होता. तो गोंधळ थांबण्यासाठी पोलीस निरीक्षक जगताप बाहेर गेले होते. त्यावेळी कोणतीही हाणामारी झालेली नाही. आपल्याकडे सीसीटीव्हीचे भक्कम पुरावे आहेत. गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेने त्यांच्यावर नेम रोखून गोळीबार केला. त्या गोळ्या त्यांच्या छातीमध्ये आणि इतर ठिकाणी लागल्या," अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी दिली.