Kalyan News : अंबरनाथमध्ये (Ambernath) दोन दिवसांपूर्वीच एमआयडीसी (MIDC) ठेकेदाराच्या (Contractor) निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता. खड्ड्यामध्ये (pit) बुडून या दोन मुलांचा होता. त्यानंतर आता इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याणच्या (Kalyan News) कैलास नगर परिसरात घडली आहे. या  घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेहान शेख असे 12 वर्षाच्या मृत मुलाचे नाव आहे. रेहान हा कैलास नगर परिसरात राहत होता. शनिवारी सकाळी शाळेतून आल्यावर रेहान कैलास नगर परिसरातील मोकळ्या जागेवर खेळत होता. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाणी साचलेल्या खड्ड्यात पडल्याने रेहानचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रेहानच्या मृत्यूनंतर शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


कैलास नगर परिसरातील मोकळ्या जागेत एका बिल्डरने इमारतीसाठी खड्डा खोदून ठेवला होता. या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यावेळी खेळताना रेहानचा बॉल या खड्ड्यात गेला. रेहान तो बॉल काढण्यासाठी खड्ड्याजवळ गेला आणि बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र त्याचा तोल गेला आणि रेहान खड्ड्यात पडला. पोहत येत नसल्याने रेहान पाण्यात बुडत होता. मात्र स्थानिकांनी हा प्रकार पाहून खड्ड्याजवळ धाव घेतली आणि अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली.


अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत रेहानला शोधण्याचे काम सुरू केले. मात्र अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर रेहानचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागला. रेहानचा मृतदेह पाहून शेख कुटुंबियांना टाहो फोडला. दरम्यान संबंधित बिल्डरने या ठिकाणी खड्डा खोदला मात्र सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.


जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू


अंबरनाथ तालुक्यातील डावलपाडा-वसार रोड परिसरात  एमआयडीसीच्या जलवाहिनी (Water Channel) टाकण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. मात्र काम झाल्यावर तो खड्डा बुजवण्यात आला नाही. अवकाळी पाऊस आणि जलवाहिनीमुळे खड्ड्यात पाणी साचलं. या खड्ड्याजवळ खेळत असताना 6 वर्षांचा सनी यादव आणि 8 वर्षांचा सुरज राजभर ही मुलं खड्ड्यात पडली. खड्डा पाच फुटांपेक्षा जास्त खोल असल्याने त्यांना वरती येता आलं नाही. परिणामी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.