मुंबई: कर्नाटकमधील बंडखोर काँग्रेस आमदारांची समजूत घालण्यासाठी मुंबईत आलेल्या डी.के. शिवकुमार यांना बुधवारी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बंडखोर आमदारांना पवईच्या रेनेझान्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या आमदारांना भेटण्यासाठी डी. शिवकुमार मुंबईत दाखल झाले होते. विशेष म्हणजे डी. शिवकुमार यांनी रेनेझान्स हॉटेलमध्ये बुकिंगही केले होते. मात्र, ऐनवेळी हॉटेल प्रशासनाने त्यांना ई-मेल पाठवून प्रवेश नाकारला. 


यानंतर डी.के. शिवकुमार रेनेझान्स हॉटेलच्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यासाठी बसले. माझा तुमच्या पोलिसांवर विश्वास नाही. ती माझी लोकं आहेत आम्ही मनाने एकत्र आहोत. मी त्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही, असे सांगत डी.के. शिवकुमार यांनी हॉटेलबाहेरून हटायला नकार दिला. यादरम्यान मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा, नसीम खान आणि संजय निरुपम हेदेखील रेनेझान्स हॉटेलच्या परिसरात दाखल झाले. मात्र, त्यांनाही हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. 


हे सर्व नेते रेनेझान्स हॉटेलच्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते. अखेर पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेतले. या तिघांना सध्या कलिना गेस्ट हाऊसला नेण्यात आले आहे. 


रेनेसान्स हॉटेल बाहेर काँग्रस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी याठिकाणी जमावबंदीचे कलम १४४ देखील लागू केले आहे. 



मिलिंद देवरा यांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका केली आहे. मी माझ्या आयुष्यात मुंबई आणि महाराष्ट्रात एवढे वाईट चित्र कधीही पाहिलेले नाही. महाराष्ट्र सरकार पोलिसांवर दबाव आणत आहे. डी. शिवकुमार यांचे हॉटेलमध्ये बुकिंग असताना त्यांना आतमध्ये जाऊन देण्यात आले नाही. ही लोकशाही नाही, असे देवरा यांनी सांगितले.