मुंबई : आसनगावजवळ नागपूर-मुंबई दुरान्तो एक्सप्रेसच्या इंजिनासह सहा डबे घसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतुक ठप्प झाली आहे. मनमाडवरून अपघात निवारण गाडी आसनगावच्या दिशेनं रवाना करण्यात आली आहे. मनमाडवरुन सुटणारी मनमाड-लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस मनमाड स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकड़े जाणाऱ्या प्रवासी गाड्या दौंडमार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मनमाडवरुन सुटणाऱ्या पंचवटी आणि राज्यराणी एक्सप्रेस इगतपुरीवरुन परत पाठविण्यात आल्या आहेत. नागपूर- मुंबई सेवाग्राम, नाशिक रोडपर्यंत सोडण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने चाकरमानी आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून पुढच्या प्रवासाबाबत मार्गदर्शन होत नसल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत.


कल्याण रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. लोकल गाड्यांची वाहतूक ही अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू असून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक 2 ते अडीच तास उशिराने सुरू आहे. नाशिककडे जाणाऱ्या गाड्या या कर्जत-पुणे मार्गे वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.