... त्यांना बोलू द्या, तुम्ही तू्र्त शांत बसा - भाजप पक्षश्रेष्ठींचा नेत्यांना सल्ला
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेने भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता.
मुंबई - उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमधील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा एकदा लक्ष्य केल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांनी विरोधकांप्रमाणे चौकीदार चोर है या थाटाचे वक्तव्य केल्यामुळे भाजपचे राज्यातील नेते शिवसेनेवर चिडले आहेत. असे असले तरी शिवसेनेने कितीही टीका केली तरी त्यांच्याविरोधात कोणतेही वक्तव्य करू नका. तूर्त शांत राहा, असे निर्देश भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी नेत्यांना दिले आहेत. दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाची बोलणी होणार की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल. तोपर्यंत शांत राहा, असेही पक्षश्रेष्ठींनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर भाजप-शिवसेनेमध्ये दुरावा, युती होणे कठीण
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेने भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता. त्यानंतर अयोध्या दौऱ्यात आणि नुकत्याच झालेल्या पंढरपूरमधील सभेतही उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सर्वाधिक टीका भाजपवरच करण्यात आली. चौकीदार चौर है असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेची री ओढली होती. त्यामुळे भाजपचे नेते जास्त नाराज झाले आहेत. पण लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली नाही, तर दोन्ही पक्षांचे नुकसान होऊ शकते, असे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे यावेळी शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्याचवेळी युतीमध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आणि गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी युती तोडल्याचे सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेना भाजपवर टीकेची संधी साधत दबाव निर्माण करीत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही भाजपवर सातत्याने टीका करण्यात येत असल्यामुळेही भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे त्यातील काहींचे म्हणणे आहे. पण युतीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत शांत राहण्याची सूचना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी केली आहे.