उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर भाजप-शिवसेनेमध्ये दुरावा, युती होणे कठीण

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली नाही, तर त्याचा फटका या दोन्ही पक्षांना बसेल.

Updated: Dec 26, 2018, 10:01 AM IST
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर भाजप-शिवसेनेमध्ये दुरावा, युती होणे कठीण title=

मुंबई - भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. त्यातच पंढरपूरमधील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडवी टीका केल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये युती होणे कठीण असल्याचे सूत्रांकडून समजते. उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमधील जाहीर सभेत राफेलच्या मुद्द्यावरून थेट विरोधकांप्रमाणे 'चौकीदार चोर' असल्याच्या थाटाचे वक्तव्य केले होते. ही टीका भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे आता युतीसाठी शिवसेनेशी जागावाटपाची बोलणी करण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप स्वतंत्रपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करीत असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली नाही, तर त्याचा फटका या दोन्ही पक्षांना बसेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला त्याचा फायदा होईल, असे विविध सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांत भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात अमित शहा यांनी मुंबईमध्ये पक्षाच्या आमदारांची आणि नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी शिवसेनेवर टीका करू नका, असा सल्लाच नेत्यांना देण्यात आला होता. पण या नंतरही शिवसेनेने भाजपवर टीका करणे थांबवलेले नाही. 

पंढरपूरमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. राफेल लढाऊ विमानांचे कंत्राट अनिल अंबानी यांच्या कंपनीला देण्यावरही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णपणे झालेली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, यावरूनही त्यांनी टीका केली. त्यामुळे आता भाजपचे नेतृत्त्व शिवसेनेवर नाराज झाल्याचे सूत्रांकडून समजते. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेची गंभीर दखल भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे.

मंगळवारी एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल विचारले असता, योग्य वेळी उत्तर देईन, एवढेच सूचक वक्तव्य त्यांनी केली. ते आता काय भूमिका घेतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x