मुंबई : ठाकरे सरकारच्या डर्टी 11 मधील राखीव खेळाडूंची यादी दुर्दैवाने वाढत चालली आहे. असे म्हणत भाजप नेते किरिट सोमय्या यांनी राज्य सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे सरकारने पाठीशी घातलेल्या भ्रष्टचारी नेत्यामध्ये प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, किशोरी पेडणेकर, रविद्र वायकर, छगन भुजबळ, जितेद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर या यादीमध्ये हसन मुश्रीफ यांचे नाव आम्ही वाढवत आहोत. असे सोमय्या यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या/ शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मनी लॉंडरींग, बेनामी संपत्ती विकत घेणे असे घोटाळे मुश्रीफ आणि परिवाराने केले आहेत. यासंबधीचे 2700 पानांचे लेखी पुरावे आम्ही इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडे सुपूर्द करीत आहोत.


CRN SYSTEM PVT LTD या कंपनीकडून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद यांनी दोन कोटींचे कर्ज घेतले आहे. ही कंपनी पूर्णतः बनावट असून 2017 मध्ये तिच्यावर प्रतिबंध आले होते. या शिवाय मुश्रीफ परिवाराविरोधात दोघांविरोधात 127 कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. असेही सोमय्या यांनी म्हटले.


सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना लिमिटेडबाबत निवडणुक प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. परंतु या कारखान्यात मुश्रीफ आणि परिवाराने 100 कोटीहून अधिक भ्रष्ट्राचाराचा पैसा पार्क केला आहे. असा घणाघाती आरोप सोमय्या यांनी केला आहे. 


हे सर्व पुरावे घेऊन उद्या आम्ही मुंबई ED कडे तक्रार दाखल करणार आहोत. असेही त्यांनी म्हटले आहे.