ठाणे: गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांची 'आयात' सुरु आहे. त्यामुळे पक्षातील निष्ठावंतांचे काय होणार, असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रविवारी ठाण्यात भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या निमित्तामुळे भाजपाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही उपस्थिती दर्शवली होती. मात्र, व्यासपीठावरील जागा अगोदरच भरल्याने त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे सोमय्यांना संपूर्ण कार्यक्रम व्यासपीठ आणि खुर्च्या यांच्यामध्ये असलेल्या पायऱ्यांजवळ बसून पाहावा लागला. सोमय्या यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे सोमय्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. 


किरीट सोमय्या हे ईशान्य मुंबईचे माजी खासदार आहेत. गेली अनेक वर्षे त्यांच्याकडे मुंबईतील भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून पाहिले जात होते. शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारीपासून वंचित राहावे लागले. त्यानंतर आता भाजपमध्ये दाखल झालेल्या नव्या नेत्यांच्या भाऊगर्दीत सोमय्या यांच्यासारख्या निष्ठावंतांचे स्थान हरवणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


व्यासपीठावर जागा न मिळाल्याने गणेश नाईकांचा भाजपच्या कार्यक्रमातून काढता पाय


दरम्यान, या सगळ्या प्रकारावर भाजपकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कार्यक्रमावेळी सुत्रचंचालकांनी सोमय्या यांना व्यासपीठावर येण्याची विनंती केली. मात्र, अनेक विनवण्या करूनही सोमय्या व्यासपीठावर आले नाहीत, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. मात्र, किरीट सोमय्या यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.