कृष्णात पाटील, झी मिडिया, मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी निवासी सोसायट्यांच्या वाहनतळांमधील अनेक 'पार्किंग स्पेस' या दिवसा रिकाम्या असतात; तर त्याचवेळी त्या परिसरात बाहेरुन येणा-या गाड्यांना मात्र अनेकदा वाहन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. ज्यामुळे अनेकदा वाहने रस्त्यालगत उभी केली जातात. परिणामी, रस्यावरील वाहतूक मंदावण्यासह वाहन चालक, मालक यांना आर्थिक दंडही भरावा लागू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध स्तरीय कार्यवाही सातत्याने करत आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून खाजगी निवासी इमारती व सोसायट्यांमध्ये असणा-या वाहनतळांच्या ज्या जागा दिवसा रिकाम्या असतात, त्या जागी बाहेरील वाहने उभी करण्यासाठी सशुल्क सेवा देता येणार आहे. यामुळे खाजगी वाहनांना अतिरिक्त वाहनतळ उपलब्ध होण्यासोबतच सोसायट्यांना देखील उत्पन्नाचा एका अभिनव पर्याय उपलब्ध होणार आहे. तरी अधिकाधिक सोसायट्यांनी या योजनेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.


बृहन्मुंबई महापालिकेच्या 'मुंबई वाहनतळ प्राधिकरण'यांच्याद्वारे खाजगी निवासी इमारती वा सोसायट्यांमधील वाहनतळाच्या दिवसा रिकाम्या असणा-या जागांची माहिती घेऊन 'पार्किंग पूल' तयार करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्यास इच्छुक असणा-या सोसायट्यांना त्यांच्या वाहनतळांमध्ये दिवसा मोकळ्या असणा-या जागा खाजगी वाहनांना भाड्याने देता येणार आहेत. यामुळे वाहनतळांचा अधिक परिपूर्ण वापर होण्यासह खाजगी सोसायट्या वा इमारतींना उत्पन्नाचा एक अभिनव मार्ग खुला होणार आहे.


या योजनेत नोंदणी करणे हे खाजगी सोसायट्यांना किंवा इमारतींना पूर्णपणे ऐच्छिक आहे. तसेच नोंदणी केल्यास उपलब्ध वाहनतळ जागांची (Parking Space) माहिती महापालिकेच्या 'MCGM 24 x 7' या ऍपवर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ज्यामुळे गरजु वाहन चालक किंवा वाहन मालक यांना वाहनतळ शोधणे सोपे होणार आहे. तरी खाजगी निवासी सोसायटी व इमारतींनी या योजनेत नाव नोंदणी करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. यानुसार सहभागी होणा-या निवासी सोसायटी किंवा इमारतीशी संबंधितांशी चर्चा करुन वाहनतळ विषयक दर ठरविण्यात येतील, असे मुंबई वाहनतळ प्राधिकरणाद्वारे कळविण्यात आले आहे.


दरम्यान या अनुषंगाने अधिकाधिक सोसायट्यांना या योजनेत सहभागी होता यावे, यासाठी महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील निवासी सोसायट्यांच्या बैठका घ्याव्यात, असे आदेश महापालिका आयुक्त श्री. प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. या योजनेंतर्गत नाव नोंदणी करण्याविषयी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी इच्छुकांनी आपल्या विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांशी किंवा पुढील इ-मेल पत्यावर संपर्क साधावाः Email:mpa.mcgm@gmail.com