मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र झालाय. शिवसेनेला डिवचण्यासाठी आणि मुंबई महानगरपालिकेत अस्थिरता निर्माण करण्यासाठी भाजपने डाव टाकलाय. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेनं मनसेचे ६ नगरसेवक फोडले होते. याविरोधात संतापलेल्या मनसेनं कोकण आयुक्तांकडे धाव घेत शिवसेनेतील प्रवेश अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. याप्रकरणी कोकण आयुक्तांनी सेनेत गेलेल्या मनसेच्या नगरसेवकांना नोटीस बजावली आहे.


  शिवसेनेतील प्रवेश केलेल्या नगरसेवकांना निधी न वापरण्यासाठी मनसेने हे पत्र आयुक्तांना  दिलं होतं. या पार्श्वभूमीवर आयुक्तांकडून सहा नगरसेवकांना नोटीस पाठवण्यात आलीय. त्यानुसार या सहा नगरसेवकांना १४ मे रोजी कोकण आयुक्तांपुढे हजर राहवं लागणार आहे. योगायोग म्हणजे पालघर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेवर दबाव निर्माण करण्यासाठी नगरसेवकांचं हे प्रकरण उकरून काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.