`...तर, कोरेगाव भिमा दंगल रोखता आली असती!`
पोलीसांनी सरकारला खोटी आणि चुकीची माहीती देऊन सरकारची दिशाभूल केली.
मुंबई : पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर, कोरेगाव भिमा येथील दंगल रोखता आली असती, असं सांगत कोरेगाव भिमा दंगलीचं खापर पोलीसांच्या माथी मारण्यात आलं आहे. कोरेगाव भिमा येथील दंगल प्रकरणी विवेक विचार मंचच्या वतीने सत्यशोधन समीती स्थापन करण्यात आली होती. भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत मंचचे अध्यक्ष आहेत. समितीचा अहवाल आज प्रकाशीत करण्यात आला.
मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला क्लीन चीट
या अहवालात कोरेगाव दंगल हे पोलीसांचे अपयश असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र, पोलीसांना जबाबदार धरतानाच , गृह खाते , मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला क्लीन चीट देण्यात आली आहे. उलट पोलीसांनी सरकारला खोटी आणि चुकीची माहीती देऊन सरकारची दिशाभूल केली. त्यामुळं विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि रश्मी शुक्ला या पोलीस अधिकार्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिलिंद एकबोटे यांनाही क्लीन चीट
दरम्यान, दंगल हे पोलीसाचं अपयश असल्याचं सांगतानाच, प्रकाश आंबेडकर, माओवादी संघटना , कबीर कला मंच , एल्गार परीषद यांना दंगलीसाठी जबाबदार धरण्यात आलं आहे. यांनी दंगल भडकवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मिलिंद एकबोटे यांना मात्र एकप्रकारे क्लीन चीट देण्यात आली आहे. मिलिंद एकबोटे याचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर भाष्य करणार नसल्याचं समितीच्या वतीने सांगण्यात आले.
पूजा सकट मृत्यू प्रकरणाबद्दल सर्वांनाच संवेदना आहेत. मात्र यामागे संघाचा हात असल्याचा दावा करणे म्हणजे प्रकाश आंबेडकरांना संघाची कावीळ झालीय. अशी टिका माजी खासदार प्रदीप रावत यांनी केली आहे.