मुंबई: राज्यातील अनपेक्षित सत्तापालटामुळे भाजपला जाऊन मिळालेल्या अनेक नेत्यांची राजकीय समीकरणे फसली. त्यामुळे या नेत्यांना आता घरवापसीचे वेध लागले आहेत. यामध्ये आता काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह यांची भर पडली आहे. गेल्यावर्षी कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र, आता राज्यात सत्तापालट झाल्यानंतर कोणतीही भीडभाड न बागळता त्यांनी पुन्हा काँग्रेसशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी कृपाशंकर सिंह यांनी सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळाचे कान टवकारले गेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'निष्ठावंतांना विचारल्याशिवाय काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुनर्प्रवेश नाही'


एकेकाळी मुंबई काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंह यांचा चांगलाच दबदबा होता. सांताक्रुझ विधानसभा मतदारसंघ हा कृपाशंकर यांचा पारंपारिक मतदारसंघ मानला जात होता. मात्र, बेहिशेबी संपत्ती प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर कृपाशंकर सिंह यांची भाजप नेत्यांशी असलेली जवळीक वाढली होती. 



एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी कलम ३७० चे समर्थन करत भाजपचा प्रचार केला होता. यावेळी त्यांनी अनुच्छेद ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसवरही टीका केली होती. मात्र, आता महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर कृपाशंकर सिंह यांना काँग्रेसविषयी पुन्हा जिव्हाळा वाटू लागल्याचे दिसत आहे.