मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेने १७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली होती. मात्र, दिवाळीत हा संप होणार असल्याने  एस टी महामंडळाने कामगार न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने संपाला स्थगिती दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, वेतन निश्चिती, विविध भत्ते व सेवा सवलती मिळाव्यात, या मुख्य मागणीसाठी एसटीच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनेने ऐन दिवाळीत १७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. त्यामुळे गर्दीच्या हंगामात संपामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना २९ सप्टेंबर रोजी संपाची नोटीस दिली आहे. या संपाला महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) पाठिंबा दिला आहे. 


संघटनेने घेतलेल्या मतदानात कामगारांनी संपाला कौल दिला आहे. हा संप १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून केला जाणार आहे. मान्यताप्राप्त कामगार संघटनेने पुकारलेल्या या संपाच्या विरोधात एस टी महामंडळाने कामगार न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कामगार न्यायालयाने २६ऑक्टोबरपर्यंत या संपाला स्थगिती दिली आहे.