मुंबई : उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) लखमीपूर घटनेतील (Lakhimpur Kheri Violence) पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य नसून तालीबानी राज असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या मुलाच्या कारने शेतकऱ्यांना चिरडलं. मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी अजयसिंह बिष्ट यांचं सरकार आटापिटा करत आहे. तर पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, खासदार दिपेंदर हुड्डा आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्याशी पोलीसांनी गैरवर्तन केलं, तसंच त्यांना  बेकायदेशीर अटक केली. 


उत्तर प्रदेशात लोकशाहीचा गळा घोटला जात असून शेतकरी, दलित, वंचित, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय आणि अत्याचार केले जात आहेत, पिडीत कुटुंबियांना भेटू दिले जात नाही. प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरीला जात असताना रस्त्यावर अनेक ठिकाणी अडवण्यात आलं. प्रियंका गांधी यांना भारतीय जनता पक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री का घाबरतात? पीडित कुटुंबियांना भेटणे भाजपाच्या राज्यात गुन्हा आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. 


उत्तर प्रदेशातील भाजपाच्या अत्याचारी राजवटीला तिथली जनता कंटाळली आहे. या अत्याचारी सरकारला जनता धडा शिकवेल. काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून प्रियंका गांधी यांना पीडित कुटुंबियांना भेटण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं पटोले म्हणाले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी नरसंहाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आज राज्यभर आंदोलन करणार आहे.