Lalbaugcha Raja : मुंबईतील (Mumbai Ganeshotsav) आणि देशभरातील भाविकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या आणि सर्वदूर ख्याती पसरलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातील काही व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दुरवरून भाविकांनी रांगा लावल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील आणि राज्यातील विविध भागातून भाविक राजाची एक झलक पाहण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहिले आणि अखेर इतक्या तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्यासमोर बाप्पाचं विलोभनीय रुप आलं. पण, इतक्या तासांच्या प्रतीक्षेनंतर मात्र त्यांना एक पूर्ण सेकंदही बाप्पाला डोळे भरून पाहता आलं नाही, कारण बाप्पाच्या चरणी डोकं टेकवताच तिथं असणाऱ्या मंडळातील काही मंडळींनी भाविकांना ताकदीनं पुढे लोटण्याचं सत्र सुरु ठेवलं होतं. 


लालबागचा राजाच्या चरणस्पर्श रांगेचं हे वास्तव सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं. या क्षणाचे अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांनी व्हायरल करत भक्तांप्रती मंडळानं नेमलेल्या स्वयंसेवक आणि इतर मंडळींची अशी वागणू निराशा आणि संताप ओढवताना दिसत आहे. 




व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये लालबागच्या राजाचं डावं पाऊल हे व्हिआयपींसाठी राखीव ठेवण्यात आलं असून, इथं गळ्यात ओळखपत्र असणारी मंडळी आणि त्यांच्या ओळखीनं येणाऱ्यांना दर्शन दिलं जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तर, बाप्पाच्या दुसऱ्या पायाशी अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर डोकं टेकवणाऱ्या भाबड्या, सामान्य भाविकाला तिथं क्षणभरही थारा दिला जात नसल्याचं पाहायला मिळत आहे. देवावरील श्रद्धा आणि प्रेमापोटी इथवरचा पल्ला गाठायचा तोही हे धक्के खाण्यासाठी? असाच प्रश्न हा व्हायरल व्हिडीओ पाहणाऱ्यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नव्हे, तर हा सर्व प्रकार थांबला पाहिले अशी आर्जवही काहींनी केली आहे.