`बाबा पाऊस आहे…ब्रिजवर गर्दी आहे`, हा शेवटचा संवाद
कामगार कल्याण मंडळाच्या २ महिला कर्मचाऱ्यांना आपला जीव एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीच्या घटनेत गमवावा लागला.
मुंबई : कामगार कल्याण मंडळाच्या २ महिला कर्मचाऱ्यांना आपला जीव एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीच्या घटनेत गमवावा लागला. श्रद्धा वर्पे ही २३ वर्षांची होती, तर मीना वाल्हेकर ही ३५ वर्षांची होती. श्रद्धा वर्पे वर्षभरापासून तेथे कामाला होती, तर मीना वाल्हेकर या सुप्रिटेंडंट होत्या.
श्रद्धाचे वडिल देखील कामगार कल्याण मंडळात कामाला होते, एलफिन्स्टन ब्रिजवर झालेल्या गर्दीतून किशोर वर्पे सुखरूप बाहेर पडले. मुलगी श्रद्धाला अजून का नाही आली म्हणून फोनही केला. 'बाबा पाऊस आहे…ब्रिजवर गर्दी आहे… बाहेर पडणे कठीण आहे', तिने सांगितले. मात्र बापलेकीचा तो संवाद अखेरचा ठरला.
पुढे गेलेल्या किशोर वर्पे यांना अशी दुर्घटना घडेल याची कोणतीच कल्पना नव्हती. या दुर्घटनेत श्रद्धा आणि मीना वाल्हेकर या दोघींचाही मृत्यू झाला. शवागाराबाहेर वाट बघणाऱ्या श्रद्धाचा भाऊ रूपेश याला शोक अनावर झाला होता, तर तिथे उपस्थित कामगार कल्याण मंडळातील कर्मचारीही सुन्न झाले होते.