मुंबई : आज लता दीदी नाहीत, पण त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते सारं काही करण्यासाठी आज उद्धव आणि राज यांचे संपूर्ण ठाकरे कुटुंबीय जिथे बाळासाहेबांना मुखाग्नी देण्यात आला होता त्याच शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या अनामिक नात्याच्या बहिणीला अखेरचा मुखाग्नी देण्यासाठी उपस्थित आहे. तिथली सारी व्यवस्था पाहत आहे... या व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जातीने उपस्थित राहून लक्ष देत आहेत.
काय होतं ते भावनिक नातं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लता मंगेशकर यांची प्रकृती अस्वस्थ होती तेव्हापासून ठाकरे कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. लता दीदींना ज्या रुग्णालयात ठेवलं होतं तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवेळी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. याचं कारण म्हणजे लता दीदी आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेलं त्यांचं नातं...


लतादीदी या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या मोठ्या भाऊ मानायच्या. लतादीदींच्या अडचणीच्या काळात अनेकदा बाळासाहेब ठाकरे मोठ्या भावाप्रमाणे त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले होते. शिवसेनाप्रमुखांचे चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र, या सर्वात लतादीदींचे स्थान अत्यंत वरचे होते. बाळासाहेबांना दीदीबद्दल एक विशेष असा आदर होता.


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आजारी होते. कुणालाही भेटणास बंदी होती. त्यावेळी बाळासाहेबांनी स्वतः लतादीदी यांना मातोश्रीवर भेटायला बोलावले होते. लतादीदी त्यांना भेटल्या तेव्हा बाळासाहेबांनी 'माझे अखेरचे काही दिवस राहिल्याची' भावना व्यक्त केली होती. या त्यांच्या बहिणीवर त्यांना पूर्ण विश्वास होता.



बाळासाहेबांनी त्यांचा नेहमीच आदर केला. त्यांना विशेष सन्मान दिला. बाळासाहेब त्यांना नेहमीच देशाचा आणि मराठी समाजाचा अभिमान मानत. दीदींच्या मनातही बाळासाहेबांबद्दल खूप आदर होता. बाळासाहेब यांचे निधन झाले तेव्हा लतादीदींनी आपल्या डोक्यावरून पुन्हा वडिलांची सावली निघून गेल्याची भावना व्यक्त केली होती.



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापन केली. त्यावेळी लतादीदींनी त्यांना ठाकरे परिवारातील एक सदस्य म्हणून शुभेच्छा दिल्या होत्या.


महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्ताने साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने मराठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले होते. राज ठाकरे यांनी मराठीपणाची ओळख ठसवण्यासाठी केलेल्या या आवाहनाला लता दीदी यांनी प्रतिसाद दिला होता.



मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेत लता मंगेशकर यांनी सहभाग घेत उषाताई मंगेशकर यांनी रेखाटलेले संत ज्ञानेश्वरांचे चित्र राज ठाकरे यांना पाठवले होते. यासोबतच त्यांनी कुसुमाग्रजांसोबतचा एक फोटोही पाठविला होता. या दोन्ही फोटोवर लता मंगेशकर यांनी मराठीत स्वाक्षरी केली होती. त्यावर लता दीदी यांनी या मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल राज ठाकरे यांनी ‘दीदी मी खरंच तुमचा ऋणी’, असल्याचे म्हटले होते.